ठाणे : जिल्ह्यातील माता व बालमृत्यूचा दर घटवण्यासाठी आता ग्रामीण व दुर्गम भागात प्रधानमंत्री मातृवंदना योजना पंधरवडा आयोजिला आहे. त्याचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे, डॉ. अंजली चौधरी आदी उपस्थित होते.
माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे, या हेतूने मंगळवार २३ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत या पंधरवड्याचे आयोजन केले आहे. राज्यात १ जानेवारी २०१७ रोजी अथवा त्यानंतर कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील. ही योजना एकवेळ आर्थिक लाभाची अन् पहिल्या जीवित अपत्यापुरतीच मर्यादित असून, या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल.
नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच हा लाभ अनुज्ञेय राहील. या योजनेत दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. पात्र लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत गर्भवती महिलांना नोंदणी करणे आवश्यक आहे. या लाभासाठी महिलेचे व तिच्या पतीचे सहमती पत्र आवश्यक आहे, महिलेचे आधार संलग्न बँक खाते अथवा पोस्ट खाते क्रमांक, संपर्क क्रमांक आवश्यक आहे. लाभार्थी महिलेच्या या खात्यात पाच हजार रुपयांची रक्कम तीन हप्त्यात जमा होणार आहे.