ठाणे महापालिका निवडणुकीचा प्रचार धडाक्यात सुरु आहे. ३३ प्रभागातून १३१ जागांसाठी आता ८०५ उमेदवार ‘डोअर टू डोअर’ प्रचार करत आहेत. पण त्यातही दिसताहेत विविध तऱ्हा. काही विद्यमान नगरसेवक ‘आम्ही तुम्हाला पाणी दिले, लाईट दिली, मुलभुत सोई-सुविधा दिल्या मग आता आमच्या प्रचारासाठी तुम्हाला आलेच पाहिजे,’ अशी गळ घालत आहेत. ंपॅनल जरी असले आणि एखादा नापसंतीचा उमेदवार त्या पॅनलमध्ये दिला गेला असेल, तर एकत्रित प्रचार न करता त्याला एकट्यालाचा प्रचाराची धुरा सांभाळावी लागते आहे. शिवसेना २५ वर्षातील विकासाचे मुद्दे घेऊन ठाणेकरांसमोर जात आहे, तर आघाडी २५ वर्षात सत्ताधाऱ्यांना न जमलेले मुद्दे घेऊन प्रचारात उतरली आहे. भाजपाने मात्र नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राइक आदी राष्ट्रीय मुद्दे घेतले असून, मनसेने ‘माझ्या हाती सत्ता देऊन बघा, मी नाशिकसारखा विकास करुन दाखवितो,’ हेच प्रेझेंटेशन सुरू ठेवले आहे. युती तुटल्याचे जाहीर झाल्यावर प्रचाराची रंगत वाढली आहे. या निवडणुकीत शिवसेनेने ११९ उमेदवार उभे केले आहेत. मुंब्य्रातील काही प्रभागात शिवसेनेने उमेदवारच दिलेले नाहीत. भाजपाने पारदर्शकतेचा आणि परिवर्तनाचा मुद्दा पुढे आणत १२० शिलेदार रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्यात आघाडी झाली असली, तरी ‘खाडी के उस पार’ म्हणत या दोघांचीही आघाडी अपेक्षेप्रमाणे काही ठिकाणी बिघडलीही आहे. २०१२ मध्ये ज्या पध्दतीने कळवा, मुंब्य्रात ११ जागांसाठी मैत्रीपूर्ण लढत झाली होती. तशाची काहीशी लढत यंदाच्या निवडणुकीत होणार असून १७ जागांवर ही ‘मैत्री’ मतदारांना पाहता येईल. या लढतींकडे सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या आहेत. मनेसे पुन्हा नाशिक पॅटर्न पुढे करीत महापालिकेच्या मुलुखमैदानात तब्बल १११ मावळे रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेची निवडणूक प्रथमच चौरंगी होईल.यापूर्वी झालेल्या निवडणुका या केवळ, शिवसेना- भाजपा विरुध्द लोकशाही आघाडी अशाच काहीशा होत होत्या. यंदा मात्र भाजपा शिवसेनेवर आक्रमक होतांना पहावयास मिळेल. शिवसेनाही २५ वर्षाचे दुखणे बाहेर काढण्यास आतूर झाली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. २५ वर्षात सत्ताधाऱ्यांनी ठाणेकरांच्या तोंडाला पाने कशी पुसली याचा पाढा वाचण्यास सुरवात केली आहे. ठाणेकरांच्या मुलभुत आणि जिव्हाळ्याच्या मानल्या जाणाऱ्या गोष्टींवरच घाला घालण्यास सुरवात केली आहे. आधी पोस्टर आणि बॅनरबाजीच्या माध्यमातून वार आणि आता दररजो पत्रकार परिषदांचा धडाका त्यांनी लावला आहे. पाणी, डम्प्ािंग, आरोग्य आदींबरोबर इतर मुद्यांनाही हात घातला जातो आहे. कळव्यात तर त्यांचा प्रचार सध्या हॉस्पिटलमधील झुरळाभोवती फिरतो आहे. कळव्यात शिवसेनेचे फारसे वर्चस्व नसले तरीही त्यांना नामोहरम करण्याची एकही संधी राष्ट्रवादी सोडताना दिसत नाही.या प्रचाराला उत्तर देण्यासाठी शिवसेनेने ‘२५ वर्षे सत्तेची २५ वर्षे विकासाची’ म्हणत ‘आम्ही हे करुन दाखविले, आम्ही ते करुन दाखविले’ असे म्हणत मतांसाठी कामांचा आधार घेतला आहे. तशा आशयाची पोस्टर, बॅनर सध्या ठाणेकरांचे आकर्षण ठरत आहेत. ज्या ठिकाणी शिवसेनेचे पोस्टर, बॅनर लागत आहे, त्याच्या बाजूला किंवा त्या पोस्टरच्या वरच राष्ट्रवादीचे देखील ‘२५ वर्षे सत्तेची २५ वर्षे नाकर्तेपणाची’ अशा आशयाची पोस्टर लागत असल्याने ठाणेकरांचे मनोरंजन सुरू आहे. भाजपाने मात्र सावध पावित्रा घेत पारदर्शकतेचा मुद्दा उचलून धरत नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राइकचे मुद्दे शहरभरातील पोस्टरवर मांडले. पण सत्तेत सहभागी असल्याने पालिकेने केलेली कामेही ते मांडते आहेत. एकाचवेळी पालिकेच्या कारभारावर टीका करताना त्याच पालिकेने केलेली कामे मांडायची कसरत तो पक्ष करताना दिसतो. या तिघांच्या श्रेयाच्या लढाईत रेल्वे रुळावरुन घसरलेल्या रेल्वेचे डबेही एक एक करुन जोडले जाऊ लागले आहेत. त्यांनीही ठाण्याचे विविध प्रश्न हाताळत फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. तो करतानाच ‘एकदा माझ्या हाती सत्ता देऊन बघा, मी नाशिकप्रमाणे विकास करुन दाखवितो,’ असे प्रेझेंटेशन मनसे देते आहे. राष्ट्रवादी आणि मनसेने उचलून धरलेले मुलभूत समस्यांचे मुद्दे काहीसे एकसारखे असल्याने शिवसेनेची दुहेरी कोंडी सुरू आहे. एकूणच सध्याचा प्रचार हा पोस्टर, बॅनरच्या अवतीभवती फिरतो आहे. परंतु रिंगणातील उमेदवार मात्र आजही गल्लीतच प्रचार करत आहेत. पक्ष शिवसेना असो अथवा भाजपा, राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेस या सर्वच पक्षांनी चार-चार उमेदवार जरी एका पॅनलमधून दिले असले, तरी त्यांच्याही प्रचारात विविध तऱ्हा दिसून येत आहेत. पॅनलमध्ये एखादा आपल्या पसंतीचा उमेदवार नसेल, तर त्याला एकटे पाडणे किंवा अपक्षाकरवी त्याचा ‘गेम’ करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पक्षात असून आणि तिकीट मिळूनही काही उमेदवार एकाकी प्रचार करतांना दिसत आहेत.
निवडणुकांच्या बाजारा... प्रचाराच्या नाना तऱ्हा
By admin | Updated: February 13, 2017 04:49 IST