उल्हासनगर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ऐन कोरोना काळात मार्च महिन्यापासून समितीच्या कार्यालयाबाहेर हे कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला राजकीय पक्षांसह विविध संघटनांने पाठिंबा दिला आहे.
उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमी वादात राहिली असून, मार्केट यार्ड नसलेली ही देशातील एकमेव बाजार समिती असेल. कोरोना काळात समितीच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याने समितीने कर्मचारी व अधिकाऱ्यांचे गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून वेतन दिले नाही. वेतन मिळत नसल्याने कर्मचारी व अधिकारी यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. वेतनासह इतर समस्यांकडे राज्य शासनाचे व समितीचे लक्ष वेधण्यासाठी २३ मार्चपासून साखळी उपोषण सुरू केले. मात्र, अद्याप उपोषणाची दखल ना समितीने घेतली ना शासनाने घेतली. याबाबत कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांची पदवीधर विकास संघटनेचे रमेश हिंदुराव यांनी शुक्रवारी भेट घेतली व समितीच्या उदासीनतेबाबत नाराजी व्यक्त केली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सातव्या नव्हे तर, पाचव्या वेतन आयोगानुसार अद्याप वेतन दिले जात असून, गेल्या पाच महिन्यांचा तोही पगार दिला नसल्याचे सांगितले. सोमवारपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर, मंगळवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.
.......