मराठमोळा ऑनलाइन नाट्यप्रयोग जर्मनीतही ‘हिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 11:25 PM2021-02-26T23:25:42+5:302021-02-26T23:26:08+5:30

नाट्यप्रेमी युवकांचा आगळावेगळा प्रयत्न

Marathmola online drama 'hit' in Germany too | मराठमोळा ऑनलाइन नाट्यप्रयोग जर्मनीतही ‘हिट’

मराठमोळा ऑनलाइन नाट्यप्रयोग जर्मनीतही ‘हिट’

Next

स्नेहा पावसकर 

ठाणे : लॉकडाऊनच्या काळात आपण अनेक गोष्टी ऑनलाइन केल्या. शाळेचे वर्ग, ऑफिसचे काम ते घरात लागणाऱ्या वस्तूच्या ऑर्डरपर्यंत सगळंच. अगदी नाटक, गाण्यांचे शोसुद्धा. या लॉकडाऊनमध्ये कल्याण-डोंबिवलीच्या नाट्यप्रेमी युवकांनी तयार केलेल्या ‘बिफोर द लाईन’ या मराठमोळ्या नाटयाचे ऑनलाईन प्रयोग झाले ते भारताबरोबरच अगदी थेट जर्मनीतही. त्याला तेथेही तितकाच चांगला प्रतिसाद मिळाला. 

जवळपास संपूर्ण जगभर लॉकडाऊन असताना त्या काळातही मराठी नाट्याने परदेशातील लोकांचे मनोरंजन करत आपले वेगळे अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. इतकेच नव्हे तर हीच नाट्यप्रेमी युवकांची टीम पुन्हा लॉकडाऊन झाले किंवा नाही तरीही पुन्हा आपला येणारा नवीन दीर्घांक जर्मनीसह इतरही काही देशांत ऑनलाइन सादर करण्याच्या विचारात आहे.

लॉकडाऊनमध्ये नाट्यगृह बंद होते, पण नाटक थांबून चालणार नाही. आपण नाटक घेऊन रसिकांपर्यंत पोहोचावे हे लक्षात घेत स्टोरिया प्रोडक्शन यांनी ऑनलाइन नाट्यप्रयोग करण्याचा विचार केला. तेव्हाची परिस्थिती आणि प्राप्त साधनांच्या साहायाने त्यांनी नाटक बसवले आणि त्याचे ऑनलाइन प्रयोग केले. भारताबरोबरीनेच जर्मनीतही याचे प्रयोग सादर करण्याचे ठरवून तिथे ‘मराठी अस्मिता जर्मनी’ या संस्थेच्या माध्यमातून ते सादरसुद्धा झाले. 

मात्र पहिल्या ऑनलाइन प्रयोगात काही तांत्रिक अडचणी आल्याने तेथील रसिकांना तो प्रयोग नीट पाहता आला नाही. त्यामुळे या टीमने प्रयोगाचे नाममात्र असलेले शुल्कही सगळ्यांना परत करून दुसऱ्या दिवशी ‘बिफोर द लाईन’चा मोफत प्रयोग दाखवला आणि त्याला तेथील प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. नितीन सावळे, नचिकेत दांडेकर, यश नवले, राजेश शिंदे या टीमने यासाठी भरपूर मेहनत घेतली.

आता पुन्हा नाट्यगृहे सुरू झाली आहेत. त्यामुळे आता नव्याने नाटयप्रयोग नाट्यगृहातच करण्यावर भर असेल. मात्र कोरोना रुग्णसंख्या वाढून लॉकडाऊन झाले किंवा नाही, तरी आम्ही आमच्या नवीन प्रसाद दाणी लिखित आणि संकेत पाटील, राजरत्न भोजने दिग्दर्शित एका मराठी दीर्घांकाच्या तालमीची मराठी राजभाषा दिनाच्या दिवशीच सुरूवात करीत आहोत, त्याचाही ऑनलाईन प्रयोग जर्मनी आणि इतरही काही देशात करणार असल्याचे या टीमने सांगितले.

Web Title: Marathmola online drama 'hit' in Germany too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे