ठाणे : एक मराठा एक कोटी मराठा, जय भवानी जय शिवाजी अशी उद्घोषणा करीत मराठा समाजाचे वादळ पुन्हा एकदा ठाण्याच्या धर्तीवर आले आणि शेकडो बाईकस्वारांनी तब्बल तीन तास संपूर्ण ठाणे, कळवा, घोडबंदर रोड वर रॅली काढून 9 ऑगस्टला मुंबईवर धडकनाऱ्या मोर्चाची रंगीत तालीम केली. नियोजनाप्रमाणे मराठा समाजाने जनजागृती यशस्वी केल्याने सर्वसामान्यापासून पोलीस यंत्रणानी समाधान व्यक्त केले.मुंबईमध्ये धडकणार्या 58 व्या अति विराट मराठा क्रांती मोर्चामध्ये ठाणेकरांना सहभाग मोठ्याप्रमाणावर होण्यासाठी तीन हात नाक्यापासून सकाळी रॅली ला सुरुवात झाली. तत्पूर्वी काळव्यात सकाळी 8 वाजता रॅली सुरू झाली आणि 11 वाजता मुख्य रॅलीमध्ये सहभागी झाली. अत्यंत शिस्तबद्धपद्धतीने रॅलीला सुरुवात झाली. मुली आणि महिलांनी पुढाकार घेतला आणि रॅली हळू हळू घोडबंदर रोडच्या दिशेने सरकू लागली. महामार्गावर येताच रॅलीचे विराट रूप ठाणेकरांना दिसले. माजीवडा, कापूरबावडी, ब्रह्मांड, मानपाडा, पातळीपाडा, वाघबिल, कासर्वादवलीला वळसा घेऊन आनंदनगरमार्गे वाघबिल गाव, हिरानंदानी इस्टेट, आझाडनगर, मानपाडा उड्डाणपुलाखालून खेवरा सर्कल, वसंत विहार, उपवन, शिवाजीनगर, वर्तकनगर, कॅटबरी, खोपट, डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड, सिव्हिल हॉस्पिटल, भवानी चौक, चिंतामणी चौक, गडकरी रंगायतांमार्गे तलाव पाळी तील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पोहचली. बरोबर पावणे दोन वाजता रॅली पोहचली आणि पाच मुली आणि महिलांनी महाराज्यांच्या पुतळ्यास हार घातला आणि कोपरडीच्या बहिणीला श्रद्धांजली वाहून रॅलीची सांगता झाली. पोलिसांना दिलेल्या वेळेत म्हणजे 2 वाजता सांगता झाली. पोलिसांनी देखील आयोजकांचे आभार मानले.
ठाण्यात पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाचे गुंजले वादळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 11:17 IST