ठाणे : मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या माळशेज घाटात ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक भीमनवार यांनी खास भटकंती केली. यादरम्यान त्यांनी नाणेघाट, वाल्हीवरे, सावर्णे, थितबी इत्यादी ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. या ठिकाणच्या पर्यटनस्थळांच्या विकासासह ट्रेकिंग पॉइंट्स विकसित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून सुमारेआठ कोटी रुपये खर्च करून माळशेजचा साजशृंगार होणार आहे. अॅडव्हेंचर ट्रेकिंग पाँइंटसाठी सुविधा उपलब्ध करून गावकऱ्यांच्या सहभागातून त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची योजना त्यांनी आखली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबरमध्ये शहापूर येथील कुणबी महोत्सवात मुरबाड-शहापूर भागांत उत्तम टुरिझम सर्किट तयार करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार, भीमनवार यांनी रु जू होताच माळशेज घाटाची भटकंती करून पर्यटन विकासाच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. या भटकंती दौऱ्यात भीमनवार यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, गटविकास अधिकारी ऐस्ताज हाश्मी, तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील, सहायक वनसंरक्षक कुंभार, सहायक गटविकास अधिकारी अविनाश मोहिते, परिक्षेत्र वनअधिकारी चन्ने, हिरवे आदींचा समावेश होता.या पर्यटनस्थळांचा विकास कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत करण्याचे निश्चित केले आहे. या सर्व ठिकाणी विशेषत: महिलांसाठी स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम, टेंट्स, डॉरमेंटरी, जोडरस्ते, अॅडव्हेंचर ट्रेकिंगसाठी सुविधा, माहिती केंद्र इत्यादींसारख्या आवश्यक सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी सुमारे साडेआठ कोटी रु पये निधी ग्रामविकास विभागाने उपलब्ध करून दिल्याचे भीमनवार यांनी स्पष्ट केले.विशेष म्हणजे पर्यटकांना आवश्यकतेनुसार योग्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक महिला बचत गट, ग्रामसंघ, युवक मंडळे आदींचा सहभाग घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्याचा सर्वंकष पर्यटन आराखडाबचत गट, युवक मंडळे यांना पायाभूत व कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्थानिक वस्तू व उत्पादने विक्रीसाठी बचत गटांना स्टॉल्ससुद्धा उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय, ठाणे जिल्ह्याचा सर्वंकष पर्यटन विकास आराखडा करण्यात येणार असल्याचे भीमनवार यांनी सांगितले.
माळशेजचे रुपडे पालटणार
By admin | Updated: April 1, 2017 05:26 IST