मुंबई : ठाणे येथील लोकमान्य नगरमधील सिद्धिविनायक पार्कमधील इमारत क्रमांक ३ च्या गच्चीवर शुक्रवारी रात्री एक माकड मृतावस्थेत दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळले. या माकडाला फास देऊन मारण्यात आल्याचे रहिवासी गणेश शेलार यांचे म्हणणे आहे. यासंबंधी त्यांनी वनविभागाकडे कळविले आहे.लोकमान्यनगर परिसरात माकडांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. त्यामुळे येथील नागरिक माकडलीलांमुळे त्रस्त असतात. सिद्धिविनायक सोसायटीच्या गच्चीवर काही लोक माकडांसाठी खाण्याचे पदार्थ ठेवतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून माकड मोठ्या संख्येने परिसरात येत असल्याने येथील नागरिकांमध्ये जनजागृतीची आवश्यकता असल्याचे टीएनएचएसचे अध्यक्ष कौस्तुभ दरवेस यांनी सांगितले. त्यामुळे २१ जानेवारीपासून या परिसरात वनविभागाच्या सहाय्याने टीएनएचएसतर्फे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. वनविभाग आणि ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (टीएनएचएस) मृत माकडाचा पंचनामा करत आहेत. त्यातून कारण समोर आल्यानंतर दोषींवर कारवाईची मागणी लावून धरू, असे ‘टीएनएचएस’ने म्हटले आहे.
गच्चीवर घेतला माकडाचा जीव, ठाणे लोकमान्यनगरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 02:43 IST