वाडा : वाडा गावातील अशोकवन या भागात असलेल्या अशोकलीला या इमारतीचे सांडपाणी आजुबाजूला सोडले जात असल्याने स्थानिक नागरीक उग्रवासाने व त्यावर होणाऱ्या डासांमुळे हैराण झाले आहेत. वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही त्याकडे गांभीर्याने बघीतले जात नसल्याने नागरीक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. येत्या आठ दिवसात सांडपाण्याची व्यवस्था न केल्यास बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा येथील नागरीकांनी दिला आहे. या इमारतीतील सांडपाण्यासाठी बांधण्यात आलेली टाकी नादुरूस्त झाल्याने शौचालय, स्वच्छतागृहातील सांडपाणी आजुबाजूला पसरते. सांडपाण्याच्या उग्र वासामुळे येथील नागरीकांना नाक मुठीत घेवून दिवस कंठावे लागत आहेत. तर डासांमुळे येथील नागरीक नेहमीच आजारी पडतात अशी माहिती नागरीकांनी दिली.या संदर्भात २८ जानेवारी २०१३ च्या झालेल्या ग्रामसभेतही हा विषय चर्चेला येऊन सांडपाण्याची योग्य व्यवस्था करण्याचा ठराव करण्यात आला होता. मात्र गेल्या दोन वर्षापासून त्यावर काहीही कारवाई केली नसल्याचा आरोप निवेदनात नागरीकांनी केला आहे.गेल्या दोन वर्षापासून उंबरठे झिजवूनही या प्रश्नाकडे पंचायत गांभीर्याने बघत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. गेल्या आठ दिवसात सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित न केल्यास बेमुदत उपोषण आंदोलनास बसण्याचा इशारा येथील नागरीकांनी दिला आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधीत बिल्डरला वेळोवेळी नोटीसा काढण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)
‘अशोक लीला’च्या सांडपाण्यामुळे स्थानिक त्रस्त
By admin | Updated: September 29, 2015 00:59 IST