मुरबाड तालुक्यातील पवाळे गावातील स्मशानभूमी नव्याने बांधण्यासाठी जनसुविधा अंतर्गत २०१८ ते २०१९ या काळात निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र श्रेयवादाच्या लढाईत व ठेका मिळविण्याच्या हट्टामुळे हे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे पावसाळ्यात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर अंत्यविधीसाठी ताडपत्रीचा आधार घ्यावा लागताे. अखेर तरुणांनी पैसे जमा करून जुन्या स्मशानभूमीवर पत्र्याची शेड बांधली. मात्र, स्मशानभूमीचे मंजूर असलेले काम त्वरित सुरू करण्याचे आदेश द्यावेत किंवा हे काम घेणाऱ्या ठेकेदारावर दिरंगाई करीत असल्याने गुन्हा दाखल करून त्याची एजन्सी काळ्या यादीमध्ये वर्ग करावी व या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुन्हा नव्याने टेंडर प्रक्रिया करण्यात यावी, अशी मागणी कोकण विभाग पत्रकार संघटनेचे मुरबाड तालुका खजिनदार गीतेश पवार यांनी केली आहे. याबाबत पवाळे ग्रामस्थ धन्यवाद व्यक्त करीत आहेत.
पवाळेतील तरुणांनी स्वखर्चातून बसविले स्मशानभूमीवर पत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:43 IST