- आदिती भिलारे, ज्योती पाटील, गौरी जोजारे -
गेली साडेतेरा वर्षे मुंबई हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम करत असलेले, सामाजिक बांधीलकी जपणारे मो.ह. विद्यालयाचे माजी विद्यार्थी न्यायाधीश अभय ओक. विद्यालयातील आजी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘कायद्याचे पालन हा संस्कृतीचा एक भाग झाला पाहिजे’ असे मत व्यक्त केले.आपल्या शाळेला १२५ वर्षे पूर्ण होताहेत. कसं वाटतयं? शाळेच्या काय आठवणी आहेत?पूर्ण महाराष्ट्रात १२५ वर्षे टिकलेल्या, नाव राखलेल्या, परंपरा जपलेल्या ज्या शाळा आहेत, त्यात आपली शाळा आहे, याचा आनंद आहे. शाळेने वक्तशीरपणाची, शिस्तीची जी सवय लावली ती आयुष्यभर उपयोगी पडली. पूर्वी मंगळवारी शेवटचा तास पी.टी.चा असायचा. तेव्हा सर्व वर्ग ग्राऊंडवर असायचे. तो ४५ मिनिटांचा तास एस.व्ही. कुलकर्णी सर पहिल्या मजल्यावरच्या लायब्ररील्या छोट्याशा खिडकीतून बघायचे. त्यामुळे डोकं दुखतयं, बरं नाही या सबबीखाली वर्गात बसण्याची कोणाचीही हिंमत नसायची, कारण कुलकर्णीसर बघत आहेत, हा धाक होता. एस.व्ही. कुलकर्णी हे आमच्या दृष्टीने ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व होते. ते जेवढे कडक तेवढेच मृदू व हळव्या स्वभावाचे होते. एकदा, एका मुलाची आई गेली, असा निरोप घेऊन त्याचे नातेवाईक आले. एस.व्ही. स्वत: त्या मुलाला टांग्यातून त्याच्या कळव्याच्या घरी सोडायला गेले. पूर्वी शाळेतल्या खुल्या रंगमंचावर नाटके व्हायची. तो रंगमंच बांधला गेला तेव्हा एक झाड मध्ये येत होते. ते पाडायचे ठरले. तेव्हा एस.व्हीं.नी सांगितले, ‘मी जेव्हा शाळेत नसेन, कामानिमित्त बाहेर असेन, तेव्हा ते झाड पाडा. मला झाड पाडताना बघवणार नाही.’ एस.व्हीं.च्या प्रेरणेने माजी विद्यार्थी संघ स्थापन झाला. मी स्वत: त्याचा चार वर्षे सेक्रेटरी होतो. संध्याकाळी शाळेतच आमचे आॅफिस असायचे. बुद्धिबळ स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी शिबिर, नाट्यप्रशिक्षण शिबिर असे अनेक उपक्रम आम्ही मुलांकरता राबवले.
घरात वडील वकील होते, म्हणून आपणही वकील झालात?नाही. मी प्रथम बी.एस.सी. गणित विषय घेऊन झालो. तेव्हा मी विद्यापीठात दुसरा आलो घेतो; पण नंतर लॉ करायचं ठरवलं. वकील झालो. दोन वर्षे डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये वकिली केली. माझ्या वडिलांनी व आजोबांनी ठाण्याला प्रॅक्टिस केली. दोन वर्षे ठाण्यात वकिली केल्यावर मग मुंबई हायकोर्टात वकिली करायला सुरुवात केली. नंतर न्यायाधीश म्हणून काम केले व गेली साडेतेरा वर्षे मी न्यायाधीश म्हणून काम करत आहे.
न्यायाधीश म्हणून काम करताना प्रेशर येत का?अजिबात नाही. लोकांना वाटतं राजकारण्यांचं वगैरे प्रेशर असेल; पण तसं अजिबात नसतं. कधी कधी निकालानंतर वेडीवाकडी पत्रे येतात, क्वचित फोन येतात. अनेक केसेसमध्ये निकाल देण्यापूर्वी शेकडो पानांचे वाचन करावे लागते. काही वेळा एकाच केसमध्ये ४०-५० फाईल्स असतात. कोर्टात जेवढे काम असते, त्याच्या दुप्पट काम घरी करावे लागते. परत शनिवार-रविवारीही काम असते; पण न्यायाधीश म्हणून काम करताना खूप समाधान लाभतं.
समाजात सर्व प्रकारची शिस्त येण्यासाठी अजून कठोर कायदे व्हावेत, असं वाटतं का?कायदे कठोरच आहेत, त्याची अंमलबजावणी कठोरपणे व्हायला पाहिजे. कायद्याची अंमलबजावणी करणारा स्वत: कायद्याचे पालन करणारा पाहिजे. होर्डिग्जवर कायद्याने बंदी आहे तरीपण ती का लागतात? मुळात आपल्याकडे कायद्याचे पालन करण्याची वृत्ती नाही. कायद्याचे पालन हा संस्कृतीचा एक भाग झाला पाहिजे; पण आपल्याकडे संस्कृतीच्या नावाखाली दुसरचं शिकवतात. शाळांनी पुढाकार घेऊन मुलांना हे सांगितले पाहिजे.
आपल्याकडे सामान्य माणूस सामन्यत: कोर्टाची पायरी चढायला धजावत नाही. कारण निकालाला लागणारा विलंब यामागचे कारण आहे?भारतातला न्यायाधीश प्रगत देशातील, प्रगत देशातील न्यायधीशांपेक्षा दहा पट काम करतो. पाप्यूलेशन-जज रेशोप्रमाणे आत्ता आहेत त्यापेक्षा ५० पट न्यायाधीश वाढवावे लागतील. आपल्याकडे तेवढे रिसोर्सेस नाहीत. तेवढ्या प्रमाणात न्यायालये झाली तर प्रक्रिया लवकर होईल. आपल्याकडे शिक्षकांना पगारासाठी व अप्रुव्हलसाठी न्यायालयात जावं लागतं. अशा छोट्या-छोट्या कारणांसाठी न्यायालयात जायला लागल्यामुळे केससची संख्या प्रचंड असते. अनेक खटल्यांमध्ये सरकारच पक्षकार असते.
१२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शाळेने काय करावे, असे तुम्हाला वाटते?मराठी माध्यमातून शिक्षण आवश्यक आहे. डॉ. जयंत नारळीकरांनी एका मुलाखतीत असे सांगितले आहे, ‘किमान सातवीपर्यंत मुलांचे शिक्षण मातृभाषेतूनच व्हायला पाहिजे. मी सातवीपर्यंत हिंदी माध्यमातून शिकल्यामुळे माझं नुकसान झालं.’ मराठी माध्यमाच्या शाळांतून इंग्रजी भाषा खूप चांगल्या रितीने शिकवली गेली पाहिजे. कायद्याच्या पालनाची संस्कृती मुलांमध्ये रुजवली पाहिजे. धार्मिक उत्सवांचा खरा अर्थ मुलांना शिकवला पाहिजे. धर्मनिरपेक्षतेचे शिक्षणही दिले पाहिजे.