ठाणे : मुंब्य्रात खिंडार पाडून राष्ट्रवादीने काँग्रेसचे गटनेते राजन किणे यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतरांना पक्षात सामील केले आहे. मात्र, किणे यांच्या इनकमिंगनंतर येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुरबुर सुरू झाली असून अनेकांनी या प्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे या नाराजांना आपल्या गळाला लावण्यासाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली असून येत्या काळात या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये असेच काहीसे चित्र रंगणार असल्याची चिन्हे आहेत. ठाणे महापालिका निवडणुकीनिमित्ताने ठाण्यात शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभा क्षेत्र मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसाच प्रयत्न आता कळवा, मुंब्य्रात राष्ट्रवादीने केल्याचा दिसत आहे. बुधवारी काँग्रेसच्या आजी, माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. तर, आगामी काळात या भागातील शिल्लक राहिलेले काँग्रेसचे नगरसेवकदेखील सामील होतील, असा दावा राष्ट्रवादीने केला आहे. असे असले तरी यामुळे राष्ट्रवादीत मात्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या भागात राष्ट्रवादीमधून अनेक इच्छुक आहेत. परंतु, आता इनकमिंग सुरु झाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे त्यांनी या भागात वेगळी चूल मांडण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे किणे यांचा पूर्वेतिहास पाहिला असता ते या आधी अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर, त्यांना शिवसेनेने आमदारकीचे तिकीटही दिले होते. परंतु, त्यांचा पराभव झाला. त्यामुळे ते नाराज झाले होते, त्यांनी ही नाराजी जाहीर प्रकटही केली होती. याच नाराजीवरून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु, काँग्रेसमध्ये राहूनही त्यांनी शिवसेनेच्या बाजूने कौल दिल्याचा इतिहास आहे. शिवसेनेच्या हातून सत्तेची गणिते निसटत असताना अनेक वेळा त्यांनी त्यांना अप्रत्यक्षरीत्या मदत केली होती. त्या वेळेस त्यांच्यावर काँग्रेसच्या श्रेष्ठींकडून शिस्त भंगाची कारवाईदेखील झाली होती. परंतु, त्यानंतरही त्यांनाच काँग्रेसने गटनेतेही दिले होते. त्यांच्या या स्वभावाचा पाढा येथील कार्यकर्त्यांनी श्रेष्ठींकडे वाचल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. (प्रतिनिधी)
मुंब्य्रात राष्ट्रवादीमध्ये कुरबुरींना सुरुवात
By admin | Updated: November 17, 2016 07:00 IST