टिटवाळा : रंगपंचमी खेळून झाल्यानंतर खडवली येथील भातसा नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजता घडली. ‘सगुणा चिकन फूड’ कंपनीच्या कल्याण शाखेतील कामगार महेंद्र खैरनार (३२) व हनुमंत ताळे (३६) यांच्यासह पाच ते सहा जण गुरुवारी रंगपंचमी खेळून झाल्यावर खडवली येथील भातसा नदीकिनारी पिकनिक स्पॉटवर आले. आंघोळीसाठी ते सर्व जण नदीपात्रात उतरले. मात्र खैरनार आणि ताळे यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यांच्या मित्रांपैकी कुणालाही पोहता येत नसल्याने त्यांनी मदतीसाठी ओरडाओरड केली. नदीवर गर्दी असतानाही कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. स्थानिक पोलीस व कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेतला. पण ते सापडले नाहीत. शुक्रवारी सकाळी ६ वाजता खैरनार यांचा मृतदेह आढळला. तो शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस नाईक संतोष मोरे यांनी दिली. तर टिटवाळा पोलीस, पोलीस पाटील, पोहणारे स्थानिक तरुण, अग्निशमन दलाचे जवान ताळे यांचा शोध घेत होते. अखेर सायंकाळी ५ वाजता त्यांचा मृतदेह सापडला. (प्रतिनिधी)
खडवली येथे भातसा नदीत दोघे बुडाले
By admin | Updated: March 26, 2016 03:35 IST