अनिकेत घमंडी, डोंबिवलीएकत्र नांदण्याची इच्छा नसतांनाही केवळ पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजपला युती करावी लागली. स्थानिक पातळीवर मात्र, दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड खलबत सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. आधी महापौरपदावरुन तर आता स्थायी समितीचा पहिला मान कोणाला या मुद्यावरुनही खल सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार पहिल्या वर्षी भाजपला स्थायी समिती सभापतीपद देण्याचा दावा त्या पक्षाकडून केला जात आहे. मात्र, त्यात शिवसेनेच्या मनात काहीतरी वेगळेच असल्याची कुणकूण लागल्याची भिती असल्याचे सांगण्यात आले. महापौर - उपमहापौर पद निवडणुकीदरम्यानही या दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड दुरावा असल्याचे विविध घटनांवरुन स्पष्ट झाले. असे असतांनाच आता स्थायीच्या सभापती पदावरुनही राजकारण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपला शिवसेनेकडून प्रचंड अपेक्षा असून पहिले वर्ष पारड्यात पडेल असा विश्वास या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना आहे. परंतु, कार्यकर्त्यांना मात्र तो नसल्याचे मिळालेल्या माहितीवरुन समोर येत आहे. शिवसेनेकडूनही काही नगरसेवकांनी स्टॅडींगचे सभापतीपद मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
केडीएमसीच्या स्टॅडींगसाठी रस्सीखेच!
By admin | Updated: November 14, 2015 02:15 IST