डोंबिवली : नववर्ष स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी शहरात विविध ठिकाणी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. ढोलताशांचे वादन, विद्यार्थ्यांचे लेझीम, नृत्य आणि तलवारबाजीने डोळ्यांचे पारणे फेडले. विशेष म्हणजे, भागशाळा मैदानात सादर झालेल्या ‘काश्मिरी रंगा’मुळे पूर्वसंध्या आणखीनच रंगीत ठरली.
काश्मीरहून आलेल्या २३ मुलांनी काश्मीरमधील लोकगीतावर नृत्य सादर केले. त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. काश्मीरच्या लेह-लडाख खोऱ्यातील गावांतून ही मुले खास गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवलीत आली आहेत. ‘हम’ या संस्थेचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी या मुलांना डोंबिवलीत आणले आहे. तसेच त्यांना मुंबईदर्शन घडवण्यात येणार आहे. काश्मिरी मुलगी रुची शर्मा हिने सांगितले की, मला हे सगळे नवीन आहे. नववर्ष स्वागतयात्रा मला पाहायची आहे. गुढी काय असते, हे जाणून घ्यायचे आहे. त्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. हिताका देवी हिने सांगितले की, देशाची संस्कृती अत्यंत महान आहे. नववर्ष स्वागतयात्रा व गुढीपाडव्याचा आम्ही उद्या एक भाग होणार आहोत.निवृत्त मेजर अच्युत देव यांनी आपल्या देशात शत्रूंचा शिरकाव होणार नाही, असे वातावरण तयार केले पाहिजे, असे आवाहन यावेळी केले.वरदविनायक झांज पथकाने चौगुला, बांबू डान्स आणि पलटा नृत्य प्रकार सादर केला. वक्रतुंड ढोलताशा पथकाने त्यांचे वादन सादर केले.पूर्वेतील राजाजी पथ येथे ढोलताशावादन करण्यात आले. स्वामी विवेकानंद शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर करून लेझीमचा ताल धरला.त्याचबरोबर पूर्वेतील चंद्रकांत पाटकर शाळेच्या पटांगणावर ढोलताशावादन झाले. यावेळी डोंबिवलीतील बालगायकांनी गाणी सादर केली. तर, पश्चिमेतील आनंदनगर येथेही ढोलताशावादन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यालाही नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.६० चित्ररथांचा सहभागगुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागतयात्रा काढण्याची परंपरा सर्वात पहिल्यांदा डोंबिवलीत सुरू झाली. शनिवारी निघणाऱ्या या यात्रेत ६० चित्ररथ, १५० सायकलस्वार सहभागी होणार आहे. त्याचबरोबर दोन लाख नागरिक सहभागी होतील, असा अंदाज श्री गणेश मंदिर संस्था आणि नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समितीतर्फ वर्तवण्यात आला.