ठाणे : पुढच्या आठवड्यात पावसाळा सुरू होणार असल्याने रस्ते दुरुस्ती, नालेसफाईची रखडलेली कामे तत्काळ उरकण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी येत्या ४८ तासांत कोणत्याही परिस्थितीत रस्त्यातील खड्डे भरणे, चेंबरवर कव्हर बसवणे आणि रस्त्यावरील डेब्रीज हटवण्याचे सक्त आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.रस्त्यांची दुरुस्ती, तुटलेल्या कफस्टोनची दुरुस्ती, फुटपाथ दुरुस्त करण्याबरोबरच नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ४८ तासांत सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, नगर अभियंता, उपनगर अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांनी आपापल्या प्रभागात फिरण्याचे आदेश त्यांनी दिले. कार्यकारी अभियंत्यांनी डेब्रीज हटवण्याबरोबरच रस्त्याच्या कामांसाठी वापरण्यात येणारी यंत्रे तत्काळ हटवावी. ७ जूनपर्यंत सर्व नालेसफाई पूर्ण झालीच पाहिजे, अशी सक्त ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. नाल्याशेजारचा गाळ, फुटपाथच्या टाक्यांमधील माती, रस्त्याच्या बाजूची माती पुढील सात दिवसांत विशेष मोहीम राबवून उचलण्यात यावी आणि त्याची छायाचित्रे काढून सादर करावी, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अवघ्या दोन दिवसांत ठाणे होणार चकाचक
By admin | Updated: June 5, 2016 03:08 IST