शशी करपे, वसईअनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तीन सहाय्यक आयुक्तांवर हल्ले झाले असून येथील पोलीस बळ भरतीच्या बंदोबस्तात गुंतल्याने त्याचे संरक्षण या मोहिमेला मिळेनासे झाल्यचे पाहून या पथकाला रोखण्यासाठी मोठा पूर्वनियोजित जमाव जमा होऊ लागला आहे. गेल्या दीड-दोन महिन्यात शिवीगाळ, धक्काबुक्की आणि हल्ल्याचे प्रकार वाढल्याने अनधिकृत बांधकामविरोधी पथकातील अधिकारी-कर्मचारी चिंंताग्रस्त झाले असून ही मोहिम ठप्प झाली आहे. आयुक्त सतीश लोखंडे यांनी सध्या शहरातील अनधिकृत बांधकामे तोडण्याची मोहिम अधिक तीव्र केली आहे. विरार, नालासोपारा, वालीव, पेल्हार, गोखीवरे परिसरातील अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर पाडली जात आहेत. मात्र, गेल्या महिन्यापासून पोलीस संरक्षण मिळत नसल्याने अनधिकृत बांधकामे तोडण्यास गेलेल्या पथकाच्या अंगावर मोठा जमाव धावून जाऊन शिवीगाळ, धकाबुक्कीसह थेट हल्ला करू लागल्याने अधिकारी-कर्मचारी धास्तावले आहेत. गेल्या महिन्यात पेल्हार प्रभागात अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला झाला होता. व्दारकानाथ पतंगराव यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक आयुक्त स्मिता भोईर घटनास्थळी पोचल्या असता मोठ्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला होता. यावेळी एका महिलेने कोयत्याने भोईर यांच्यावर हल्ला केला होता. सुदैवाने एका नागरीकांने तो वार स्वत:वर घेतल्याने भोईर थोडक्यात बचावल्या होत्या. त्यानंतर नालासोपारा शहरात उपायुक्त किशोर गवस यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत बांधकाम तोडत असलेल्या पथकावर पाचशेहून अधिक लोकांच्या जमावाने हल्ला चढवला होता. यावेळी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव आणि अशोक गुरव यांच्यासह पालिका कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आली. हा प्रकार घय्ऋल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोचले. विरार येथील कारगील नगरातही जमावाने पथकाला रोखून धरले होते. मुंबई हायकोर्टाच्या आदेशावरून कारवाई करीत असताना येथील लोकांनी पथकाला तीन वेळा रोखून परत पाठवले. त्यामुळे कारगील नगरमधील कारवाई बंद करण्यात आली आहे. शनिवारी पेल्हार प्रभागात कारवाईसाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्तांसह अतिक्रमण प्रतिबंधक अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी मोठा जमाव जमा झाल्याने पथकाला कारवाई करणे अशक्य होऊन बसले होते. शुक्रवारी दुपारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव आणि अशोक गुरव नालासोपारा परिसरात कारवाईसाठी गेले असता मोठा जमाव आडवा आला. त्यानंतर एका ठिकाणी पाण्याचा टँकर उभा करून पथकाला कारवाई करण्यापासून रोखण्यात आले. कारवाईच्या वेळी पोलीस नसतात याची जाणिव असलेल्या चाळमाफियांनी जमाव गोळा करून कारवाईत अडथळा आणण्याची नवी शक्कल लढवली असून त्यात ते यशस्वीही होऊ लागले आहेत.
वसईतील तोडू मोहीम ठप्प
By admin | Updated: April 4, 2016 01:54 IST