कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र आणि २७ गावात सुरु असलेली बेकायदा बांधकामे रोखण्याची जबाबदारी बिल्डरांची नाही. ती महापालिका व एमएमआरडीएची आहे, असा दावा एमसीएचआयचे सदस्य व भाजप नगरसेवक मनोज राय यांनी केला. कल्याण, डोंबिवली व २७ गावांत बेकायदा चाळी बांधल्या जातात. स्वस्त घरांचे आमिष दाखवत फसवणूक केली जाते. याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न विचारल्यावर ते बोलत होते. अनधिकृत बांधकामे आणि फसवणुकीचा विपरित परिमाण अधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांच्या व्यवसायावर होतो. पालिका व २७ गावांच्या हद्दीतील आरक्षित जागेवर बेकायदा बांधकामे केली जातात. ज्या जागा उद्याने व डीपी रोडसाठी आरक्षित आहेत. त्यावर बेकायदा बांधकामे उभी रहात आहेत. पालिकेने स्मार्ट सिटीचा प्रकल्प हाती घेतला आहे. पण जर आरक्षित जागा गिळंकृत होत असतील, तर स्मार्ट सिटीसाठी जागा कुठे शिल्लक राहिली? स्मार्ट सिटीचा प्रकल्प हवेत उभारला जाणार आहे का, असा सवाल राय यांनी केला. भंगारवाले, रिक्षावाले आाणि चिकन विक्रेते एकत्रित येत पाच-पाच लाखाची रक्कम गोळा करुन बांधकाम प्रकल्प सुरु करतात. त्यांना या व्यवसायाचे ज्ञान नसते. त्यातून बेकायदा बांधकामे फोफावतात आणि स्वस्त घरे घेणारे बळी पडतात. ही फसवणूक रोखण्यासाठी पालिका व एमएमआरडीएने कारवाई करायला हवी, यावर त्यांनी भर दिला. आरक्षित जागेवर साधा फलकही लावण्याची तसदी पालिका व एमएमआरडीएकडून घेतली जात नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांच्या या वक्तव्याला एमसीएचआयचे अध्यक्ष रवी पाटील यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, शहरातील रस्ते व चौक विकसित करण्याचे काम एमसीएचआयचे सदस्य असलेले बिल्डर करतात. त्या बदल्यात पालिका त्यांना कोणत्याही सुविधा पुरवित नाही. ठाणे महापालिकेत मोकळ््या जागेला चौरस फुटाला ८०० रुपये कर लागू केला जातो. तोच कर कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत १४०० रुपयांवर जातो. या करांमुळे बिल्डर त्रस्त आहेत. हा कर कमी करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. पण निर्णय होत नाही. फक्त आश्वासन दिले जाते, असा आरोप त्यांनी केला. मुंबईत नव्या घराचा चौरस फुटाचा दर ५० हजार रूपये आहे. त्या तुलनेत कल्याण-डोंबिवलीत तो साडेतीन हजार ते साडेपाच हजार रुपये आहे. मुंबईच्या तुलनेत कल्याण-डोंबिवलीच्या हद्दीत परवडणारी घरे आहेत, असा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)पुढील आठवड्यात कल्याणमध्ये प्रदर्शनएमसीएचआयचे सातवे प्रॉपर्टी प्रदर्शन ६ ते ९ एप्रिलदरम्यान कल्याणच्या फडके मैदानात भरवले जाईल. त्यात ८० पेक्षा जास्त बिल्डर सहभागी होतील. एका छत्राखाली १५० गृह प्रकल्पांची माहिती मिळेल. या प्रदर्शनाला २० हजार ग्राहक भेट देतील आणि ३०० घरे बूक होतील, असा अंदाज आहे. या वेळी एमसीएचआयचे पदाधिकारी दीपक मेहता, जोहर जोजवाला, अरविंद वरख, विकास जैन, हितेश पटेल आदी उपस्थित होते.नोटाबंदीच्या काळात १०० कोटींचा फटकानोटाबंदीच्या काळात कल्याण-डोंबिवलीतील घरबांधणीच्या व्यवसायाला १०० कोटींचा फटका बसला होता. जानेवारीनंतर पुन्हा घरांचे बुकिंग सुरु झाले आहे. व्यवयासाला उर्जितावस्था येत आहे, असे मत बिल्डरांनी मांडले.
अवैध बांधकामे रोखणे आमचे काम नाही
By admin | Updated: April 1, 2017 05:35 IST