लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे केडीएमसीकडून जारी होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरून स्पष्ट होत आहे. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, सॅनिटायझर वापरा या आवाहनाबरोबरच मनपा प्रशासन आणि पोलीस विभागाने नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी काही निर्बंध घातले आहेत; परंतु काही अपवाद वगळता या नियमांना तिलांजली दिली जात असल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहायला मिळते. लग्नसराई, हळदीचा कार्यक्रम एवढेच नव्हे, तर अंत्यविधीलाही मोठी गर्दी होत आहे. विशेषकरून शहरालगतच्या ग्रामीण भागांमध्ये हे चित्र दिसून येते. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होत असले तरी हे प्रकार आजही सर्रास सुरू आहे.
कोरोना रुग्णांमध्ये दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरूपाची कोरोनाची लक्षणे आढळून येत आहेत. पालिका क्षेत्रात कोरोना चाचण्यांमध्येही वाढ करण्यात आली असून, रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतणाऱ्यांचे प्रमाणही सर्वाधिक असले तरी शनिवारपर्यंतचा आढावा घेता गेल्या २० दिवसांत मनपा हद्दीत कोरोनाचे तब्बल पाच हजार ३३९ नवे रुग्ण आढळले आहेत, तर १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डोंबिवली पूर्व आणि कल्याण पश्चिममध्ये रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनाची वाढलेली संख्या पाहता केडीएमसी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने राज्य सरकारच्या सूचनांनुसार काही निर्बंध घातले आहेत. लग्न समारंभात केवळ ५० जण, हॉटेलमध्ये ५० टक्के क्षमतेने ग्राहकांना परवानगी, अंत्यसंस्काराकरिता २० जण तसेच सिनेमा आणि नाट्यगृहांमध्ये ५० टक्केच प्रेक्षक असतील असे नियम घालून दिले आहेत. हॉटेल आणि बार, रेस्टॉरंटला रात्री अकरापर्यंत चालविण्याची परवानगी आहे. यावर सर्वस्तरातून टीकेची झोड उठविली जात असताना संबंधित व्यावसायिकांकडून घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नाही. बारमध्ये प्रामुख्याने ५० टक्के ग्राहक असण्याच्या नियमांना तिलांजली दिली जात असून, हॉटेलचालकांकडूनही उल्लंघन होत असल्याचे चित्र दोन्ही शहरांत दिसून येते. सिनेमा आणि नाट्यगृहांमध्ये मात्र या नियमांचे काटेकोर पालन होताना दिसून आले. नाट्य आणि चित्रपट रसिकांना तिकीट देताना एक खुर्ची सोडूनच ते दिले जाते.
लोकल आणि लग्नसराईतून कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर संक्रमण होत असल्याचे वरिष्ठ पातळीवर झालेल्या निष्कर्षामधून समोर आले आहे. याउपरही मोठ्या प्रमाणात गर्दी करून लग्नाचे बार उडवून दिले गेल्याचे कल्याणमध्ये झालेल्या दोन कारवाईतून समोर आले आहे. शहरात होणाऱ्या सोहळ्यांवर काही प्रमाणात स्थानिक पोलीस यंत्रणा आणि मनपा पथकांचे लक्ष असले तरी शहराजवळच्या ग्रामीण भागात मात्र बेफिकीरपणा वाढतच चालला आहे.
------------------------------------------
राजकीय व्यक्तींना गांभीर्य नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलने, मोर्चा काढण्यावर बंधने घालण्यात आली आहेत; परंतु आजही दोन्ही शहरांमध्ये राजकीय व्यक्तींकडून कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून आंदोलने छेडण्याबरोबरच मोर्चेही काढले जात आहेत. समस्या असो अथवा चुकीची धोरण यावर आवाज उठविणे आवश्यक असले तरी छेडल्या जाणाऱ्या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याने गांभीर्यही संबंधितांना राहत नाही. एकूणच चित्र पाहता नागरिकांसह राजकीय व्यक्तींना कोरोनाचे गांभीर्य न राहिल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रभावावर सरकारी यंत्रणांना दोष का द्यायचा, हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.