ठाणे : लखनौच्या धर्तीवर ठाणे शहर पोलिसांनी आता ‘मोबाईल डेटा टर्मिनल’ यासारखी आणखी एक अत्याधुनिक सेवा देणारा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे एखाद्या घटनास्थळाचे व्हिडीओ आणि छायाचित्रे काही क्षणात पोलिसांना मिळणार आहेत. त्याचबरोबर त्या परिस्थितीवर नियंत्रण राखण्यासाठी तत्काळ मदत करणे सोयीचे ठरणार आहे. तसेच यामध्ये पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना टप्प्या-टप्प्यांनी खास मोबाईल दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरण्यास ठाणे शहर पोलिसांनी सुरूवात केली. त्यातच कमांड सेंटर उभारण्याबरोबर आता मोबाईल डेटा टर्मिनल हा उपक्रम हाती घेतला आहे. या टर्मिनलला जीपीआर आणि जीपीएस सिस्टिम जोडली आहे. त्यामुळे कंट्रोलमध्ये येणाऱ्या कॉलचे लोकेशन्स समजून एखाद्या घडलेल्या घटनेचा ठिकाणी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना तत्काळ पोहचता येणार आहे. तसेच हे पोलीस त्यांना दिलेल्या खास मोबाइलद्वारे तेथील परिस्थितीचे व्हिडीओ आणि छायाचित्र काढून काही क्षणात कंट्रोल रूमकडे धाडणार आहेत. त्यानुसार, संबधित परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊनच आवश्यक वाटल्यास तेथे काही पोलीस फौजफाट्यासह इतर मदत पाठवणे सोयीचे ठरणार आहे. तसेच हे व्हिडीओ आणि छायाचित्र पुरावा म्हणूनही वापरता येणार आहे. तर पहिल्या टप्प्यात काही जणांना टॅबप्रमाणे मोबाइल देण्यात येणार आहे. दहा-दहा जणांना टप्प्याटप्प्याने ते दिले जाणार असून, त्याला धूळ आणि पाणी आदींपासून बचावाबाबत ही दक्षता घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
पोलिसांना मिळणार घटनेची क्षणात माहिती
By admin | Updated: November 11, 2015 02:26 IST