अनिकेत घमंडी, डोंबिवलीडोंबिवलीकर महिलांसाठी अधिकृत रिक्षा स्टँडवर स्वतंत्र रांगेचा प्रस्ताव १९ जुलै २०१४ रोजी शहर वाहतूक शाखा व रामनगर पोलीस ठाण्याला आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिला होता. मात्र त्यास आता दोन वर्षे उलटून गेली तरी त्याची अंंमलबजावणी झालेली नाही. याचा अर्थ आमदारांचा प्रस्ताव वाहतूक विभागाने बासनात गुंडाळल्याचे स्पष्ट झाले.महिलांची प्रचंड गर्दीतून आणि काही आबंटशौकीन पुरूषांच्या कचाट्यातून सुटका करण्याकरिता आ. चव्हाण यांनी हा प्रस्ताव दिला होता. महिलांनी त्या प्रस्तावाचे स्वागत केले होते. त्यावेळी शहर वाहतूक पोलिसांच्या दालनात झालेल्या बैठकीला सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण एस.के.डुबल, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिवरकर, तत्कालीन शहर वाहतूक पोलीस अधिकारी एस.यादव आदींसह सर्वच रिक्षा युनियनचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आमदारांच्या मागणीनुसार शहरातील सर्वच अधिकृत रिक्षा थांब्यावर महिलांकरिता स्वतंत्र रांगेची सोय देण्यात यावी, प्रायोगिक तत्त्वावर रामनगर येथे असलेल्या एस.व्ही रोडसह, सुनील नगर, राजाजी पथ, नांदिवली, केळकर रोड, रामचंद्र नगर आदी भागात जाणाऱ्या रिक्षांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. त्यामुळे या स्टँडचे महत्व अनन्यसाधारण असल्याने येथे या सूचनेचा अवलंब करावा. महिलांचा स्वतंत्र रांगेला प्रतिसाद कसा मिळतो हे पाहून व्याप्ती वाढवावी, असे ठरले होते. रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनीही आपली मते मांडली, मात्र ही संकल्पना स्वागतार्ह असून त्याची अंमलबजावणी सुसूत्रबद्धतेने होणे गरजेचे असल्याचे सांगितले. ही सोय करतांना अन्य कोणाचीही गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेण्यात यावी याकडे बैठकीत लक्ष वेधले होते. तसेच सकाळपासून रात्रीपर्यंत महिलांची स्वतंत्र रांग असावी की गर्दीच्या विशिष्ट वेळी असावी, याबाबतही मते व्यक्त झाली होती. त्या बैठकीनंतर हा प्रस्ताव ट्रॅफिक विभागाच्या विभागीय पोलीस आयुक्तालय, ठाणे येथे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. याचा लाभ ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिला, गरोदर माता, विकलांग महिलांसह विद्यार्थिनींना प्रामुख्याने झाला असता.
रिक्षाकरिता महिलांसाठी स्वतंत्र रांग कागदावरच !
By admin | Updated: February 29, 2016 01:43 IST