बारशाच्या समारंभात नाचताना झालेल्या गोळीबारात एका १२ वर्षाच्या मुलाचा जीव गेल्यावर शहरातील वैध आणि अवैध शस्त्रांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अंबरनाथच्या आयुध निर्माण कारखान्यातून २०० रिव्हॉल्वरचा गैरव्यवहार वर्षभरापूर्वी झाला होता. तर याच शहरात बेकायदा शस्त्र खरेदी करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळेच गुन्हेगारी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्यांची मोठी टोळी या शहरात उभी राहत आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळेच बेकायदा शस्त्रांचा व्यापार तेजीत आला आहे. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये गुन्हेगारी वाढत असतानाच या शहराच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा मोठा शस्त्रसाठाही गुन्हेगारांच्या हातात आला आहे. शहरात गोळीबार होण्याचे प्रमाण तीन वर्षात सर्वाधिक आहेत. हे सर्व गोळीबार बेकायदा मार्गाने मिळविलेल्या गावठी गट्टा, रिव्हॉल्वर आणि पिस्तूलमधून झाले. १० हजारापासून ते १५ लाखापर्यंत बंदुकांची विक्री येथे झालेली आहे. उत्तर भारतातून आलेली अनेक शस्त्रे ही अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. तलवार आणि चॉपरने हल्ले करणारे गुन्हेगार आता शस्त्रांचा वापर करुन थेट दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्यांना अधिकृत शस्त्र परवाना मिळत नाही ते बेकायदारित्या शस्त्र वापरण्यासही मागे पुढे पाहत नाहीत. त्यातच जे गुन्हेगारी स्वरुपाचे आहेत त्यांची पहिली पसंती रिव्हॉल्वरचीच आहे. काहीच नाही तर किमान गावठी कट्टा बाळगण्याची क्रेझ वाढली आहे. बदलापूरमध्ये अशा बेकायदा शस्त्रांमुळे अनेकजण जखमी झाले आहेत. तर काहीजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गुन्हेगार योगेश राऊत याच्यावर त्याच्या विरोधकांनी गोळीबार केला होता. तर योगेशनेही आपल्या गुंडाना घेऊन शिवसेना उपशहरप्रमुख मोहन राऊत यांच्यावर गोळीबार करुन त्यांना ठार मारले. राऊत यांच्या हत्येमागे बेकायदा शस्त्रांचा समावेश होता. या आधी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख रवींद्र पाटील यांची देखील वांगणीत अशाच शस्त्राच्या मदतीने गोळीबार करुन हत्या करण्यात आली. यातील आरोपींना अटकही केली होती. त्यांच्याकडून हत्येसाठी वापरलेले शस्त्रही जप्त केली होती. गोळीबाराचा प्रकार येथेच थांबलेला नाही. आरटीआय कार्यकर्ते अरुण सावंत यांच्यावर देखील पालिका कार्यालयासमोर गोळीबार करण्यात आला. त्यात त्यांना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे.
बेकायदा शस्त्रांचा व्यापार तेजीत
By admin | Updated: February 13, 2017 04:50 IST