डोंबिवली: मध्य रेल्वेच्या उपनगरिय वाहतूकीला अडथळा ठरलेल्या ठाकुर्ली रेल्वे फाटकाची समस्या आणखी महिनाभर भेडसावणार आहे. दिड वर्षापासून सुरु असलेल्या ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाचा लोकार्पण सोहळा मार्च ऐवजी आता एप्रिलच्या दुस-या पंधरवड्यात होणार आहे.कल्याण डोंबिवली महापालिकेचे प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली. ते म्हणाले की, या उड्डाणपूलाचे काम युव्हीबी या घाटकोपरच्या कंपनीने घेतले असून त्यांना दोन महिन्यामध्ये वाळुच्या रॉयल्टी संदर्भातील अडचण भेडसावल्याने समस्या निर्माण झाली होती. पूलाच्या स्लॅबचे काम त्यामुळे रखडले होते. पण आता ती समस्या निकाली निघाली असून काम पुन्हा जोमाने सुरु झाले आहे. आगामी महिनाभरात पूर्व-पश्चिमेकडील काम नक्की पूर्ण होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मार्च महिन्यात ते काम पूर्ण होणार असल्याचा दावा महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी केला होता, परंतू तांत्रिक अडचणींमुळे ते काम आता आणखी १ महीना लांबणीवर पडणार असल्याने एप्रिलपर्यंत डोंबिवलीकरांसह ठाकुर्लीवासियांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.* डोंबिवलीच्या एकमेव उड्डाणपूलावर सध्या प्रचंड ताण येत आहे. एखादी चार चाकी अथवा बस पुलावर अडकल्या संपूर्ण शहराचे वाहतूक नियोजन कोलमडते. प्रामुख्याने शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांसह सण-उत्सवाच्या काळात शहरात संध्याकाळच्या वेळेत सर्वत्र वाहतूक कोंडी होते. त्यामुळे स्थानक परिसरात वाहने घेऊन येतांना वाहनचालक आता टाळाटाळ करत असून त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यासाठी ठाकुर्ली उड्डाणपूल तात्काळ होणे आवश्यक असून महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी प्राधान्यक्रमाने या प्रकल्पाची पूर्तता करावी अशी मागणी त्रस्त वाहनचालकांमधून होत आहे.
एप्रिलमध्ये ठाकुर्ली उड्डाणपूलाच्या लोकार्पणाचा मुहुर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 16:44 IST
मध्य रेल्वेच्या उपनगरिय वाहतूकीला अडथळा ठरलेल्या ठाकुर्ली रेल्वे फाटकाची समस्या आणखी महिनाभर भेडसावणार आहे. दिड वर्षापासून सुरु असलेल्या ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाचा लोकार्पण सोहळा मार्च ऐवजी आता एप्रिलच्या दुस-या पंधरवड्यात होणार आहे.
एप्रिलमध्ये ठाकुर्ली उड्डाणपूलाच्या लोकार्पणाचा मुहुर्त
ठळक मुद्दे वाळुच्या रॉयल्टी समस्येमुळे झाला विलंब मार्चच्या पंधरवड्यात होणार होते काम