ठाणे : मुंबईत सध्या एका इमारतीत ५ कोरोना बाधित आढळले तर इमारत सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु ठाण्यात एका इमारतीत १० रुग्ण आढळल्यास इमारत सील केली जाणार आहे. २०० मीटर भागात १५ रुग्ण आढळल्यास तो भाग सील केला जाणार आहे.कोरोनाचे संक्रमण वाढल्यास त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे शाखेशी चर्चा झाली असून खाजगी रुग्णालये गरज असल्यास पुन्हा अधिग्रहित केली जाणार आहेत. या ठिकाणी पुरेसे बेड उपलब्ध होणार आहेत. सध्या ठाण्यात २०५९ बेड उपलब्ध असल्याची माहिती ठाणे पालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी दिली.साधा सर्दी ताप आला असल्यास ठाण्यातील खाजगी क्लिनिक किंवा रुग्णालयांनी आधी रुग्णाची कोरोना चाचणी करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. त्यामुळे ही सर्दी साधी आहे की कोरोनामुळे झाली आहे, याचे निदान होईल त्यानुसार रुग्णावर उपचार करणे सोपे जाईल, असेही त्यांनी सांगितले. यासाठी कोविड सेंटर आणि कळवा रुग्णालयात वेगळा वॉर्ड सज्ज ठेवण्यात आला आहे. तेथे अशा रुग्णांची व्यवस्था करण्यात येणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व शौचालयांची दिवसातून किमान तीन ते चार वेळा साफसफाई, गर्दीची ठिकाणे, मुख्य रस्ते, चौक या ठिकाणी निर्जंतुकीकरण करणे तसेच नियमित साफसफाई करण्याच्या सूचना देतांनाच शनिवार पासून फवारणीची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मागील काही दिवसापासून शहरातील नौपाडा, उथळसर, माजिवडा - मानपाडा आणि वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढतांना दिसत आहेत. त्यामुळे या भागांची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भागातच अशी रुग्णवाढ आहे का, याची चाचपणी केली जाणार असून वेळ पडल्यास येथे कन्टेनमेंट झोन निश्चित केले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
रुग्णवाढीचा दर दुप्पटमागील दीड ते दोन महिने रुग्णवाढीचा दर कमी होता. ८० ते १०० च्या आतमध्ये रुग्ण आढळत होते. परंतु मागील सात दिवसात रुग्ण वाढ अधिक होतांना दिसत आहे. सात दिवसापूर्वी रुग्ण वाढ ही २.१० टक्के एवढी होती. १८ फेब्रुवारीला ती ५.१२ टक्क्यांवर आली आहे.