लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सरकारने सांगितलेल्या अटीत न बसणारे प्रवासी रविवारी प्रवास करण्यासाठी ठाणे स्टेशनवर आले असता, तिकीट खिडकीवर त्यांना तिकीट नाकारल्याने प्रत्यक्षदर्शी पाहायला मिळाले, तर विनातिकीट प्रवास करणाऱ्या आणि ठाणे स्टेशनवर आढळलेल्या प्रवाशांवर टीसींनी कारवाई केली.
कोविड लसीकरण पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल रेल्वे प्रवास करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आणि त्यानंतर आजपासून पात्र नागरिकांसाठी प्रवास सुरू झाला. रविवारी पहिला दिवस असला, तरी सकाळपासून रेल्वे स्टेशनवर फारशी गर्दी दिसली नाही. रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने आणि स्वातंत्र्य दिन असल्याने, ही गर्दी नसल्याचे ठाणे स्टेशनवरील प्रवाशांनी सांगितले. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहूनच तिकीट देत असल्याचे, तसेच ज्यांचे कोविड लसीचे दोन डोस पूर्ण झाले अशांचे प्रमाणात पत्र पाहूनच मासिक पास देत असल्याचे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. आजपासून रेल्वे प्रवास सुरू होणार, म्हणून अत्यावश्यक सेवेत नसणारेही तिकीट खरेदी करताना आले असता, तिकीट खिडकीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तिकीट नाकारले. रेल्वे स्टेशनवर टीसीकडूनही तिकिटांची तपासणी होत होती आणि तिकीट नसलेल्यांवर कारवाई केली जात असल्याचे चित्र होते. तिकिटांच्या रांगेत मात्र प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला होता, तसेच ट्रेनमध्येही विनामास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता प्रवास सुरू होता.
फोटो मेलवर