पुराच्या पाण्यामुळे शेकडो वाहने झाली नादुरूस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 01:57 AM2019-08-07T01:57:59+5:302019-08-07T01:58:20+5:30

इंजिनमध्ये गेले पाणी; उंदरांनी वायरही कुरतडल्या, गॅरेजचालकांची कामे दुपटीने वाढली

Hundreds of vehicles were damaged due to flood water | पुराच्या पाण्यामुळे शेकडो वाहने झाली नादुरूस्त

पुराच्या पाण्यामुळे शेकडो वाहने झाली नादुरूस्त

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांत आलेल्या पुराचा फटका शेकडो वाहनांना बसला आहे. दुचाकींच्या इंजिनमध्ये पाणी गेल्याने ती नादुरुस्त झाली असून, त्यामुळे गॅरेजचालकांची कामे दुपटीने वाढली आहेत. दोन-तीन दिवसांपासून दुचाकी मोठ्या प्रमाणात दुरुस्तीसाठी येत असल्याचे गॅरेजचालकांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात कल्याणमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सखल भाग जलमय झाला होता. या पुरामुळे जनजीवन ठप्प झाले होते. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. सोबतच शहरातील शेकडो वाहने पुराच्या पाण्यामुळे नादुरुस्त झाली. ही वाहने दुरुस्तीसाठी शहरातील विविध गॅरेजमध्ये आणण्यात आली आहेत. त्यामुळे गॅरेजमध्ये काम दुपटीने वाढल्याचे गॅरेजमधील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
शहरातील वल्लीपीर रोड, बिर्ला महाविद्यालय, लालचौकी, खडकपाडा, बेतुरकरपाडा, रामबाग, पौर्णिमा टॉकीज, विठ्ठलवाडी परिसर, वालधुनी, खडेगोळवली, कर्णिक रोड, चक्कीनाका, सूचकनाका, मलंगरोड यासारख्या ठिकाणांसह अन्य गॅरेजमध्ये दोन-तीन दिवसांपासून ६० ते ७० दुचाकी दुरुस्तीसाठी येत आहेत.

एरव्ही, दररोज १० ते १२ दुचाकी दुरुस्तीला येत होत्या. मात्र, आता पुरानंतर अशा वाहनांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. आमच्याकडे दररोज ३० पेक्षा जास्त दुचाकी येत आहेत, असे बेतुरकरपाडा येथील गॅरेजचालक दीपकने सांगितले. पुरामुळे नादुरुस्त झालेली ९० टक्के वाहने दुरुस्तीसाठी आमच्या गॅरेजमध्ये आली आहेत. पुरामुळे अनेक वाहने बुडाली होती, तर अनेक वाहने वाहून गेली होती. त्यामुळे इंजिनात पाणी जाणे, सायलेन्सर खराब होणे, इंजिन नादुरुस्त होणे अशा तक्रारी येत आहेत. त्यातच उंदरांनी दुचाकीची वायर कुरतडल्याने वाहनांचे नुकसान झाल्याचे गॅरेजचालक दिनेश याने सांगितले. पावसाळ्यात वाहने नादुरुस्त होत असतात. पण पुरामुळे नादुरुस्त वाहनांचे प्रमाण अधिक आहे. सध्या नादुरुस्त वाहने दुरुस्त करून देण्याच्या कामाला प्राधान्य देत असल्याचे गॅरेजचालक धिरज यांनी सांगितले.

पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या दुचाकींचे मालक इन्शुरन्ससाठी येत असून ५0 टक्क्यांपर्यंत त्यांचा क्लेम मंजूर होत असल्याची माहिती एका इन्श्युरन्स एजंटने दिली. पूराच्या पाण्यामुळे माझ्या गाडीचे इंजिन खराब झाले होते. गॅरेजमध्ये दुचाकी दुरस्तीसाठी दिली असता, दुरु स्तीचा खर्च एक हजार रु पये आल्याचे एका दुचाकी चालकाने सांगितले.

Web Title: Hundreds of vehicles were damaged due to flood water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर