कल्याण : राज्य सरकारतर्फे सोमवार, १ जुलैला ३३ कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. याअंतर्गत केडीएमसी, एमएमआरडीए, वनविभाग व महसूल विभाग यांच्यातर्फे आंबिवली येथील वनजमिनीवर वृक्षारोपण केले जाणार आहे. एमएमआरडीएतर्फे केडीएमसी हद्दीत रिंगरोड प्रकल्प राबवण्यात येत असून त्यात बाधित होणारी झाडे तोडण्यापूर्वीच त्याच्या पाचपट म्हणजे १० हजार ५०० नवीन झाडे यावेळी लावण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत संबंधित वनजमिनीवर विविध प्रजातींच्या झाडांच्या माध्यमातून भविष्यात पक्षी अभयारण्य उभारण्याचा मानस आहे.केडीएमसी हद्दीत दुर्गाडी ते आंबिवली, टिटवाळा तसेच डोंबिवलीपर्यंत रिंगरोड एमएमआरडीए बांधत आहे. पहिल्या टप्प्यात एक ते सहा भागांत त्याचे काम चालणार आहे. त्यात २१०० झाडे बाधित होणार आहेत. प्रकल्पात बाधित होणारी झाडे तोडण्याची परवानगी एमएमआरडीएने केडीएमसीच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे मागितली होती. ती दिली असून एका झाडाच्या बदल्यात पाच झाडांची लागवड केली जाणार आहे. एमएमआरडीए आणि केडीएमसी यांच्यात रिंगरोड प्रकल्पाबाबत झालेल्या सामंजस्य कराराप्रमाणे केडीएमसीने वृक्ष तोडण्याची परवानगी द्यायची, पण त्याची पर्यायी व्यवस्था तसेच वृक्षलागवडीसाठी लागणारा खर्च एमएमआरडीएने करायचा, असे ठरले. संबंधित प्राधिकरणाने वनविभागाकडे जमिनीची मागणी केली होती. त्यानुसार, आंबिवली तील वनजमीन सर्व्हे ११, २५/२ व २७/२ ही उपलब्ध करून देण्यात आली आहे. २५ हजार झाडे लावता येतील, असे केडीएमसीचे उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले. यासाठी पालिकेच्या शहर अभियंतासपना कोळी-देवनपल्ली यांनीही पुढाकार घेतला.मागील वर्षीची झाडे सुस्थितीतमागील वर्षी आंबिवलीत दोन हजार २५० झाडे लावण्यात आली होती. त्यांचे योग्य प्रकारे संगोपन केल्याने ते सर्वच्या सर्व चांगल्या स्थितीत आहेत.१ जुलैला सकाळी ११ वाजता होणाऱ्या वृक्षारोपण सोहळ्याला कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, बंदरे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, अन्य पदाधिकारी तसेच संबंधित प्राधिकरणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.दरम्यान, एमएमआरडीए व केडीएमसीने झाडे तोडण्यापूर्वीच त्याच्या लागवडीसंदर्भात घेतलेली दक्षता महत्त्वाची ठरली आहे.
आंबिवलीत होणार साडेदहा हजार वृक्षलागवड; केडीएमसी, एमएमआरडीएचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:17 AM