भिवंडी: देश प्रगती करत आहे विश्वात देशाचा गौरव होत आहे हा सन्मान फक्त आणि फक्त देशातील सजक नागरिकांमुळे शक्य होत आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. ते भिवंडी येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ध्वजारोहण प्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे संस्थाध्यक्ष विजय जाधव,कार्याध्यक्ष बी डी काळे,उपाध्यक्ष अरुणा जाधव,सरचिटणीस रोहित जाधव,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम भोईर, मुख्याध्यापक सुधीर घागस उपस्थित होते. तर कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी आरएसएस संघ स्वयंसेवक, प्रतिष्ठित नागरिक,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'या संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब जाधव यांनी त्यागपूर्वक समाजासाठी कार्य केले. असेच अनेकांनी देशासाठी त्याग केला आज आपण आपल्या कर्तव्यासह जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या परंपरांची जपणूक करीत बंधुभावाने जगणे हाच खरा धर्म आहे', असे मोहन भागवत म्हणाले.
कोण किती कमावतो...
'समाजाचे सहयोग घेऊन समाजासाठी कार्य करणे हाच खरा धर्म आहे.देश पुढे जात असताना येथील भारतीयांची प्रतिष्ठा वाढली असून कोण किती कमावत त्यापेक्षा समाजासाठी किती वाटतो त्यावर माणसाची प्रतिष्ठा ओळखली जाते असे सांगत विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रगतीत यश मिळवून त्याचा समाजासाठी उपयोग करावा', असा संदेश मोहन भागवत यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेतर्फे विजय जाधव यांनी डॉ मोहन भागवत यांना रामलल्लाच्या मूर्ती सोबत संस्थापक अण्णासाहेब जाधव यांचे चरित्र भेट देऊन त्यांचा सन्मान केला. तर प्रास्ताविकात कार्याध्यक्ष बी. डी. काळे यांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा परिचय दिला.