अंबरनाथ पालिकेला लाज कशी वाटत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:20 AM2019-04-29T00:20:03+5:302019-04-29T00:20:36+5:30

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या मध्यभागी असलेल्या वडवली तलावाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मुळात हे काम करण्याची जबाबदारी स्थानिक पालिका प्रशासनाची असतानाही शहरातील सेवाभावी संस्था हे काम करत आहेत. जे काम पालिकेला जमले नाही, ते काम खासगी संस्थेच्या मदतीने होत असल्याने पालिकेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

How do you feel like Ambernath? | अंबरनाथ पालिकेला लाज कशी वाटत नाही?

अंबरनाथ पालिकेला लाज कशी वाटत नाही?

Next

पंकज पाटील

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या मध्यभागी असलेल्या वडवली तलावाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मुळात हे काम करण्याची जबाबदारी स्थानिक पालिका प्रशासनाची असतानाही शहरातील सेवाभावी संस्था हे काम करत आहेत. जे काम पालिकेला जमले नाही, ते काम खासगी संस्थेच्या मदतीने होत असल्याने पालिकेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अंबरनाथ नगरपालिका हद्दीत असलेला आणि बदलापूरला लागूनच असलेला वडवली तलाव हा एक निसर्गरम्य परिसर आहे. या परिसराचे सुशोभीकरण केल्यास दोन्ही शहरांतील नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. मात्र, या तलावाच्या सुशोभीकरणाचा मुद्दा अनेक वर्षे रखडलेल्या अवस्थेतच राहिला आहे. त्यामुळे या तलावाचे सुशोभीकरण आणि गाळ काढण्याचे काम ३० ते ४० वर्षे झाले नाही. या तलावाची खोली सर्वात जास्त असतानाही चार ते पाच वर्षांत गाळ आल्याने तलावात पाण्याची क्षमता कमी झाली होती. पाणी कमी राहत असल्याने मासे आणि पक्षी यांचा वावर कमी झाला होता. मात्र, या तलावाची दयनीय अवस्था अंबरनाथ पालिकेने कधीही अनुभवली नाही. पंधरा वर्षांपूर्वी या तलावाचे सुशोभीकरण आणि विकासाचे काम बीओटी तत्त्वावर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र, ती फाइल गहाळ झाल्याने हा तलाव जैसे थे परिस्थितीत राहिला. त्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्याने या तलावाची फाइल पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न केला नाही. पाच वर्षांत तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात इमारती उभारण्यात आल्याने या भागातील नागरिकांना हे चांगले ठिकाण निर्माण करता यावे, यासाठी नव्याने प्रयत्न करण्यात आले. एवढेच नव्हे तर टीडीआरच्या माध्यमातून या तलावाचे सुशोभीकरण करण्याचा प्रयत्नही करण्यात येणार होता. मात्र, ज्या विकासकांनी हा प्रस्ताव पुढे केला होता, त्याचा प्रस्ताव तांत्रिक अडचणीत अडकल्याने पुन्हा या तलावाला उतरती कळा लागली.

तलावाच्या सुशोभीकरणाचे आणि गाळ काढण्याचे काम अंबरनाथ पालिकेने करणे अपेक्षित होते. मात्र, पालिका प्रशासन हे काम करण्यात अपयशी ठरल्याने आता तलावाच्या परिसरात राहणाºया नागरिकांनी आणि सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. जीबीके ग्रुपमधील तरुणांनी पुढाकार घेत तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या वर्षी तलावाचे काम सुरू करण्यात आले. अर्थात, एवढ्या मोठ्या तलावाचा गाळ काढणे, हे खर्चिक असल्याने त्यासाठी शहरातील दानशूर व्यक्तींचाही हातभार घेतला. शहरासाठी चांगले काम होत असल्याने अनेकांनी जेसीबी, पोकलेन मशीन, डम्पर एवढेच नव्हे, तर जागेवर काम करण्यासाठी कामगारही पुरवले. हा प्रकार पुढे महिनाभर सुरू राहिला. अनेकांनी हातभार लावल्याने तलावाचा निम्मा गाळ उपसण्यात आला. मात्र, त्याचदरम्यान पाऊस पडल्याने गेल्या वर्षी हे काम थांबवण्यात आले. थांबलेले काम पुन्हा सुरू करण्यात आले असून शहरात पुन्हा एकदा सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती यांनी या कामासाठी हातभार लावला आहे. अनेकांची मदत या कामासाठी होत असल्याने अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने काम पुढे सरकत आहे. सरकारी कामालाही लाजवेल, असे नियोजनबद्ध कामकाज सुरू आहे. तलावातील ९० टक्के गाळ काढण्यात आला असून महिनाभरात उर्वरित काळ काढून हा तलाव पुनर्जीवित करण्यात येणार आहे. या तलावात असलेले नैसर्गिक झरे पुन्हा सुरू करून तलावाचा परिसर सुशोभित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या कामासाठी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्था आपल्या शक्तीप्रमाणे अर्थसाहाय्य करत आहे. लाखोंचा खर्च करून हे काम केले जात असतानाही अंबरनाथ पालिकेकडून एक रुपयाचीही मदत करण्यात आलेली नाही. याउलट, पालिकेची मदत न घेताच हे काम करण्याचा प्रयत्न सेवाभावी संस्थांनी सुरू केला आहे. त्यामुळे भविष्यात या तलावाचे सौंदर्य वाढल्यास त्याचे श्रेय पालिकेने घेऊ नये, एवढी माफक अपेक्षा व्यक्त होत आहे.

ज्या भागात हा तलाव आहे, त्या भागाचे सौंदर्यीकरण करून या परिसरातील बांधकाम व्यावसायिक आपला बांधकाम व्यवसायातील नफा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप होत असला, तरी एवढे मोठे काम करणे, हे सहज शक्य नाही. त्यामुळे या कामावर आरोप करणारे व त्या कामासाठी सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. तलावाशेजारी पालिकेचे उद्यान आरक्षण असून त्या उद्यानाचा विकास केल्यास दोन्ही शहरांसाठी एक चांगला स्पॉट तयार करणे शक्य होईल. गेल्यावर्षी सुरू झालेले हे काम आता यावर्षी संपणार आहे. हे निश्चित चित्र आहे. त्यामुळे पालिकेने उशिरा का होईना, या परिसराच्या कामाकडे लक्ष द्यावे, अशी गरज व्यक्त होत आहे.

गेल्या २० ते २५ वर्षांत तलावाचा केवळ प्रस्ताव तयार करून पालिकेने आपली जबाबदारी झटकण्याचे काम केले. त्यामुळे गाळमुक्त झालेल्या तलावाच्या सुशोभीकरणाचे काम पालिकेने केल्यास वाढत्या शहराला एक निसर्गरम्य ठिकाण मिळणार आहे. या तलावाच्या शेजारीच शिव मंदिर असून या शिव मंदिराच्या परिसरात भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या भाविकांनादेखील तलावाचा परिसर मंत्रमुग्ध करणारा ठरेल.

Web Title: How do you feel like Ambernath?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.