लोकमत न्यूज नेटवर्क बदलापूर : बदलापूर शहरातील रस्त्याला लागून असलेल्या सर्व दुकानदारांनी अतिक्रमण करुन उभारलेल्या शेड पालिकेने दोन दिवस मोहीम राबवत काढून टाकल्या. कारवाई सुरू होताच अनेक व्यापाऱ्यांनी स्वत:हून शेड काढले. मात्र कात्रप चौकातील एका बड्या हॉटेलमालकाने शेड तशीच ठेऊन त्यातच हॉटेल सुरु केले आहे. बदलापूर शहरातील सर्व दुकानदारांची अनधिकृत शेड तोडण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. ती कारवाई करतांना अनेक दुकानदारांनी आधीच शेड तोडल्या. शहरातील मुख्य रस्त्यांना लागून असलेली एकही शेड शिल्लक न ठेवण्याची ठोस भूमिका पालिकेने घेतली आहे. मात्र पालिकेच्या या कारवाईला न घाबरता कात्रप चौकात एका बारमालकाने अनधिकृत शेडमध्येच बार थाटला आहे. लहान दुकानदारांच्या शेडवर कारवाई करणाऱ्या पालिकेला या हॉटेलमालकाची शेड का दिसली नाही, याचीच सध्या चर्चा सुरू आहे. ज्या ठिकाणी हे हॉटेल आहे तेथील इमारतीत बारला परवानगी देण्यात आली आहे. मात्र बारमालकाने दुकानात कमी तर दुकानाबाहेर सर्वाधिक अतिक्रमण करुन बार थाटला आहे. पालिकेच्या कारवाईनंतर हा हॉटेलमालक ही शेड काढेल, अशी अपेक्षा होती. मात्र अनेक दुकानदारांनी प्रामाणिकपणे शेड काढल्यावरही या हॉटेलमालकाने अद्याप शेड काढलेली नाही. असाच प्रकार कात्रप रोडवर एका दुचाकी विक्रेत्याच्या बाबतीतही घडला आहे त्यानेही दुकानाबाहेर शेड टाकून अनधिकृत दुकान तयार केले आहे. त्यालाही पालिकेने अभय दिले आहे. या संदर्भात मुख्याधिकारी देविदास पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘दोन दिवस पोलीस बंदोबस्तात जेवढी कारवाई करता आली तेवढी करण्यात आलेली आहे. कात्रप चौकातील बारवरील शेड आणि इतर अनधिकृत शेड यांच्यावरही पोलीस बंदोबस्त मिळताच कारवाई केली जाईल. बंदोबस्त मिळत नसल्याने ही कारवाई लांबणीवर गेली आहे. मात्र बंदोबस्त मिळताच एकही शेड शिल्लक राहणार नाही.’’
हॉटेलच्या शेडवरील कारवाई लांबणीवर
By admin | Updated: June 29, 2017 02:47 IST