उल्हासनगर : पावसाळा संपून अवघे दोनच महिने उलटले असतानाच उल्हासनगरातील पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले आहे. जवळपास तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहत असून उरलेले दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सध्या सात टक्के पाणीकपात लागू असताना ही स्थिती असताना पाटबंधारे विभागाने सुचवल्यानुसार जर २० टक्के पाणीकपात लागू झाली, तर हाहाकार माजण्याची भीती आहे. नागरिकांवर सध्या बोअरवेलचे दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. उल्हासनगर पालिकेकडे पाण्याचा स्वत:चा स्रोत नसल्याने पुरवठ्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. अपुऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल नगरसेवक एमआयडीसीला जबाबदार धरत आहेत, तर लोकसंख्येच्या गरजेच्या दुप्पट पाणीपुरवठा होऊनही जर नागरिकांना तीनच दिवस पाणी मिळत असेल, तर उरलेले अतिरिक्त पाणी जाते कुठे, असा प्रश्न आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना पडला आहे. त्यांनी शहराचा दौरा करून पाणीचोरी व गळतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अवैध नळजोडणी तोडण्याचे आदेश देऊनही हाती काहीच लागलेले नाही. गळती थांबवून मुबलक पाण्यासाठी ३०० कोटींची योजना राबवली. तीही ठप्प आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने पाण्याच्या टाक्यांवर कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्याची वेळ पालिकेवर आली होती. टंचाईची झळ कमी करण्यासाठी पालिकेने भूगर्भीय सर्वेक्षण न करताच हातपंप व बोअरवेल खोदण्याचा सपाटा लावला. महिनाभरात २०० पेक्षा जास्त बोअरवेल व हातपंपाला पालिकेने मंजुरी दिली. त्यावर, चार कोटींचा खर्च केला. त्यातील अर्ध्याअधिक बोअरवेल दुरुस्ती व पाण्याविना कोरड्याठाक आहेत. सध्या धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही आठवड्यातून चार दिवस अपुरे पाणी मिळत असल्याने हातपंपाचे दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याची माहिती शिवसेनेचे गटनेते सुभाष मनसुलकर यांनी दिली. (प्रतिनिधी) पूर्व-पश्चिम पाणीयुद्ध पेटणारपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर पाण्याच्या प्रश्नाने राजकीय रंग घेतला आहे. शहराच्या पूर्वेला एमआयडीसीच्या जांभूळ व पाले जलसाठ्यातून ३७, तर पश्चिम बाजूला शहाड गावठाण जलसाठ्यातून ८८ एमएलडी पाणीपुरवठा होतो.पूर्वेला आठवड्यातून चार दिवस अपुरे व कमी दाबाने पाणी मिळते. पूर्व-पश्चिम भागात असमान पाणी वितरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून पूर्वेपेक्षा पश्चिमेला जादा पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ रविवारी नगरसेवक विजय पाटील यांनी रास्ता रोको केला. शिवसेनेचे गटनेते सुभाष मनसुलकर यांनी ३० डिसेंबरला शिवसेनेचे काही नगरसेवक पाण्यासाठी उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली. कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून त्यांच्यामुळे पाणीयोजना अडल्याचा आरोप यापूर्वी महासभेत झाला आहे. सेलवन हटाव, शहर बचाव, अशी मोहीम उघडण्यात आली होती. त्यांच्या हकालपट्टी व चौकशीची मागणी झाली होती. गेल्या उन्हाळ्यात हातपंप-बोअरवेल खोदण्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी केला आहे.
उल्हासनगरमध्ये भीषण पाणीटंचाई
By admin | Updated: December 27, 2016 02:51 IST