अंबरनाथ : अंबरनाथ तहसीलदार कार्यालयासमोरील शाळेसाठी दिलेल्या शासकीय जागेवर अनधिकृतपणे ४५ गाळे उभारण्यात आले होते. या दुकानांवर कारवाई करून तो भूखंड मोकळा करण्याची मागणी एका नागरिकाने केली होती. त्यानुसार, या गाळ्यांवर कारवाईदेखील होणार होती. मात्र, येथील दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्याचा निर्णय घेतला असून ती उद्या, १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सुनावणीत अतिक्रमण हटवण्याच्या आदेशाला तारीख मिळते की, थेट निर्णय मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.अंबरनाथ महात्मा गांधी विद्यालयासाठी शासनाने शेती विषय शिकवण्यासाठी शाळेला भूखंड दिला होता. मात्र, कालांतराने शेती विषय बंद झाल्याने हा भूखंड पडीक अवस्थेत होता. या जागेवर काही व्यापाऱ्यांनी ४५ अनधिकृत गाळे उभारत त्यावर अतिक्रमण केले. हे अतिक्रमण हटवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शौकत शेख यांनी केली होती. मात्र, स्थानिक आणि जिल्हापातळीवर कारवाई होत नसल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. शासनाने या अनधिकृत गाळ्यांना दिलेल्या स्थगिती आदेशावर सुनावणी करताना ही स्थगिती उठवण्याचा निर्णय दिला. स्थगिती आदेश उठल्याने या दुकानांवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार, तहसीलदारांनी कारवाईचे आदेशदेखील काढले होते. मात्र, कारवाई होणार, हे निश्चित झाल्यावर येथील व्यापाऱ्यांनी पुन्हा राजकीय दबाव निर्माण करीत जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाई रोखण्याची मागणी केली. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात नव्याने सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. पुन्हा सुनावणी होणार असल्याने ही कारवाई तात्पुरती पुढे ढकलली आहे. आता उद्या तारीख मिळते की थेट निर्णय, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)
शासकीय जागेवरील दुकानांच्या वादावर आज सुनावणी
By admin | Updated: February 13, 2017 04:58 IST