ठाणे : ठाणे महापालिकेचे पाचपाखाडी भागातील मुख्यालय हलविण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. सध्याच्या मुख्यालयाचा भार दिवसेंदिवस वाढत असून यासाठी नवीन महापालिका भवन बांधण्याचा प्रस्ताव यापूर्वीच तयार केला आहे. मात्र, या प्रस्तावाला फारशी चालना मिळाली नसून तो फायलीतच अडकला आहे. मात्र, येत्या काही महिन्यात सध्याचे मुख्यालय हलविण्याची तयारी प्रशासनाने केली असल्याचे बोलले जात आहे.विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयावरून निर्माण झालेला वाद संपला असला तरी या मुद्यावरून दुर्लक्षित राहिलेल्या नवीन प्रशासकीय भवनाच्या प्रकल्पाला चालना मिळण्याची शक्यता आहे. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर सुरुवातीला जिल्हा परिषदेसमोर तिचे मुख्यार्यालय होते. या ठिकाणी आता कोणतेच काम होत नसून पाचपाखाडी येथे असलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतींमधूनच गेल्या अनेक वर्षांपासून सर्व कारभार हाकला जात आहे. त्याचबरोबर कामाच्या विस्तारीकरणासाठी प्रभागस्तरावर १० प्रभाग कार्यालयेदेखील आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे कामाचा बोजा वाढला असून अनेक विभाग वाढले आहेत. दैनंदिन कामासाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक मुख्यालयात येतात. कामाचा हा ताण कमी करण्यासाठी २०१३ मध्ये नवीन महापालिका भवन बांधण्याचे प्रस्तावित केले होते. या प्रस्तावाबाबत अद्याप कोणत्याही प्रकारच्या हालचाली झालेल्या नाहीत. २०१३ पासून हा प्रस्ताव तसाच प्राथमिक पातळीवर अडकला आहे. रेमंडच्या सुविधा भूखंडावर हे नवीन महापालिका भवन उभारण्यात येणार होते. ते भविष्यात जरी निर्माण झाले तरी पालिकेचा कारभार दोन्ही प्रशासकीय इमारतींमधून सुरु ठेवण्यात येणार आहे. पालिकेने मुख्यालय वगळता माजिवडा या ठिकाणी नागरी संशोधन केंद्रदेखील बांधले आहे. यामध्ये केवळ महत्त्वाच्या बैठका तसेच संशोधन संदर्भात महत्त्वाच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. बराच वेळ पालिकेचे अधिकारी या नागरी संशोधन केंद्रामध्येच उपलब्ध असल्याने त्याच ठिकाणी पालिकेचा अर्धा कारभार सुरु आहे. माजी महापौर अशोक वैती यांनीदेखील महापालिकेचा कारभार नवीन मुख्यालय बांधून त्याठिकाणी हलवावा अशी सूचना केल्यानंतर या प्रकल्पाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
ठामपा मुख्यालय नवीन जागेत?
By admin | Updated: March 22, 2017 01:28 IST