ठाणे : दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या रांगोळीच्या मैदानावरून प्रसिद्ध रांगोळीकार वेद कट्टी यांना अनोळखी व्यक्तींनी मंगळवारी धमकावले. ‘जे काही चालले आहे, ते थांबवा, नाहीतर रांगोळी काढता येणार नाही’ अशा शब्दांत दम दिला. त्याचा कलाक्षेत्रातील मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना तीव्र शब्दांत धिक्कार केला आहे. सांस्कृतिकनगरीत ही दादागिरी खपवून घेता कामा नये, असा सूर मान्यवरांनी लावला. गेल्या अनेक वर्षांपासून गावदेवी मैदानात रांगोळी रेखाटणाऱ्या रंगवल्ली संस्थेला या वर्षी मैदान दिले गेले नाही. ‘प्रथम अर्ज करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार हे मैदान रंगवल्लीला मिळाले नाही. १५-१६ वर्षांपासून आपण रांगोळी रेखाटत असून आपल्याला जाणीवपूर्वक डावलले गेल्याचा आरोप वेद कट्टी यांनी केला. त्यामुळे हा मैदानाचा वाद पेटला. त्या प्रकरणी त्यांनी आवाज उठविल्यामुळे त्यांना धमकी देण्यापर्यंत प्रकरण गेले. ते समजताच त्यावर कला क्षेत्रातील मान्यवरांनी निषेध करत ‘मैदाना’वरून धमकावणे आपली संस्कृती नसल्याचे मत व्यक्त केले. ठाण्यासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहरात अशी असहिष्णुता बरी नव्हे, असा तिरकस सल्लाही त्यांनी दिला.एखाद्या कलाकाराला धमकी देणे अयोग्यच आहे. परंतु, ज्या संस्थेने गावदेवी मैदानात रांगोळी काढण्यासाठी अर्ज केला, त्यांना ते मैदान मिळाले. रंगवल्लीने गृहीत धरले होते की, त्यांना मैदान नक्की मिळणार. परंतु, नियमाप्रमाणे आधी बुकिंग करणाऱ्यांना मैदान मिळणे योग्य आहे. यात काही गैर नाही. थोडक्यात, त्यांनी मैदान आधी घेण्याचा प्रयत्न केला.- सदाशिव कुलकर्णी, चित्रकारअशा प्रकारचा त्रास कलाकाराला देऊ नये. कलेवर प्रेम नसलेल्यांनी हे कृत्य केले आहे. हा माणुसकीवरचा हल्ला आहे. तुम्हाला काही येत नसेल तर कमीतकमी कलेचा आस्वाद तरी घ्यावा. अशा घटनेचा सौम्य शब्दांत निषेध करतो. - गुणवंत मांजरेकर, रंगावलीकारही गंभीर बाब आहे. शेवटी, रांगोळी ही एक कला आहे आणि संस्कृती म्हणून कलेची मांडणी होते. घडलेली घटना ही संस्कृतीवर केलेला प्रहार आहे. ज्या मंडळींनी हे कृत्य केले, त्यांनी शांतपणे विचार करायला हवा होता. रांगोळी ही वैयक्तिक कला नसून ती पूर्वापार चालत आलेली आहे. ती संस्कृती आहे. - विजयराज बोधनकर, चित्रकारएखादा कलाकार एखाद्या जागेत अनेक वर्षे रांगोळी काढत असेल तर त्यांच्याआधी दुसऱ्या संस्थेने ते मैदान जाऊन बुक करणे, हे अयोग्य आहे. त्यात कलाकाराला धमकी दिली जाते, हे योग्य नाहीच. कलाकाराला त्याची कला सादर करण्याची मुक्तता हवी. - त्र्यंबक जोशी, रंगावलीकार
हे ‘मैदान’ नव्हे धमकावण्याचे!
By admin | Updated: March 31, 2016 02:52 IST