ठाणे : एकपात्री, द्विपात्री व एकांकिका अशा विविधांगी आविष्काराने २९८ क्रमांकाच्या कट्ट्याला एक वेगळाच साज चढला होता. यावेळी हा तो भुताच्या वाड्याच्या थराराने रंगला. या सादरीकरणाचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला. रविवारची संध्याकाळ अभिनय कट्ट्याच्या रंगात न्हाऊन निघाली. यावेळी ‘भुताचा वाडा’ या एकांकिकेचे सादरीकरण केले. कदीर शेख दिग्दर्शित या एकांकिकेमध्ये गणेश गायकवाड (मिडीयम), हितेश नेमाडे (मानव), प्रशांत सकपाळ (प्रशांत), अमर पडवळ (अमर), परेश दळवी (चिमण) यांनी प्रमुख भूमिका केल्या. भुताच्या शोधात असलेल्या चार भित्र्या मित्रांची फौज एका वाड्यात शिरते आणि तिथे त्यांना मिडीयम नावाचा एक प्लँचेट करणारा एक बाबा भेटतो. तिथे गेल्यावर या सगळ््यांचाही प्लँचेट करायचे ठरते. मध्यरात्रीच्या वेळेत एका भयाण शांत असणाऱ्या वाड्यात हे चौघे शिरतात मग तिथे होणारी धडपड, घबराट, आत्म्यांचा असणारा वावर आणि मिडीयमच्या अंगात येणारी भूत या सर्वांच्या परिणामाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. प्रितम कांबळे याने ‘भाईसाहेब’ तर मयूर जाधव याने ‘खानदानी चोर’, मंगेश राऊत आणि विनायक बोरवणकर यांनी अनुक्रमे ‘मध्यांतर’ आणि ‘ड्रायवर’, कल्पेश डुकरे याने ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या एकपात्री सादर केल्या. तसेच, सई कदम हिने एक ‘गवळण’ तर श्रावणी कदम आणि रोहिणी राठोड यांनी ‘नवऱ्याच्या सहा जाती’ या द्विपात्रीच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवले. (प्रतिनिधी)
‘भुताच्या वाड्या’ने प्रेक्षक खिळले
By admin | Updated: November 16, 2016 04:20 IST