ठाणे : पालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यानेच बाल्कनीचे छत कोसळल्याची माहिती तांत्रिक अहवालामधून पुढे आली आहे. त्यातही फायर फायटिंग लाइनची डागडुजी न केल्यामुळे हा सर्व प्रकार घडला असल्याचे या अहवालात स्पष्ट नमूद केले आहे. नाट्यगृहात मोठ्या आगीची घटना घडल्यास ही फायर फायटिंग लाइन निरुपयोगी असल्याचेही या अहवालातून सिद्ध झाल्याने एखादी आगीची घटना घडली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे.काशिनाथ घाणेकर रंगमंचाच्या बाल्कनीच्या छताचा भाग २७ एप्रिलच्या दिवशी रात्री कोसळला होता. या घटनेच्या काही वेळ आधी एक खाजगी कार्यक्र म सुरू होता. त्या वेळी हा प्रकार झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. अद्यापही या नाट्यगृहाच्या दुरु स्तीचे काम सुरू झालेले नसून पुढील आठवड्यात ते सुरू होण्याची शक्यता आहे. ऐन मे महिन्यात नाट्यगृह बंद राहिल्यामुळे नाट्यप्रेमींची निराशा झाली आहे. चार दिवसांपूर्वी तांत्रिक अहवाल पालिकेला प्राप्त झाला असून फायर लाइनवरून परवानगी दिलेल्या मर्यादेहून खूप अधिक प्रमाणात पाणी वाहत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे फायर फायटिंग लाइनवर गळती झाल्याचे दिसून येत आहे. ध्वनिग्राहक एकोस्टिक फोममध्ये पाणी शोषले गेल्याने अधिक वजनाने छप्पर कोसळले, असे या अहवालामध्ये नमूद केले आहे. हे नाट्यगृह सुरू होऊन ६ वर्षे झाली आहेत, तरीही पालिकेने त्याच्या देखभालीकडे लक्ष दिलेले नाही. तेथील गळती दुर्लक्षित का राहिली, यामागचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे. तळ मजल्यावरील इन टेक मीटर साधारणपणे फायर लाइनवरून अधिक पाणी वाहिल्यास रीडिंग दाखवतात. या मीटर्सने असा काही अॅलर्ट दाखवला होता का, याची पडताळणी करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. (प्रतिनिधी)
देखभालीअभावी कोसळले ‘घाणेकर’चे छत
By admin | Updated: May 13, 2016 02:16 IST