मीरा रोड : थर्टीफस्ट आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी उत्तराखंडला गेलेल्या आणि २ जानेवारीला ऋषिकेश येथे मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात गंगा नदीत बुडालेल्या मीरा रोडच्या करण जाधव (२०) याचा मृतदेह अखेर सोमवारी सापडला. मंगळवारी पहाटे तो विमानाने येथे आणण्यात आला. करण आई - वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मंगळवारी सकाळी शोकाकूल वातावरणात सकाळी मीरारोड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.शांती पार्कमधील माधव टॉवर येथे राहणारा करण हा कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. त्याची आई शिक्षिका असून वडील नोकरी करतात. जाधव कुटुंब मूळचे कोकणातील वैभववाडी येथील आहे. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेला करण हा मनमिळाऊ होता. महाविद्यालयातील विविध कार्यक्रमात देखील तो पुढे असायचा. थर्टीफस्ट तसेच नवीन वर्ष साजरे करण्यासाठी महाविद्यालयातील मित्र-मैत्रिणी आणि अन्य मित्रांनी उत्तराखंडला जाण्याचा बेत आखला होता. शिवपुरी ते नीम बीच असे सोळा कि.मी.चे गंगा नदीत राफ्टींग केले. राफ्टींग नंतर करणसह त्याचा मित्र विनय शेटी (रा. वांद्रे) हे दोघे वरुन उड्या टाकू लागले. वेगाचा अंदाज न आल्याने विनय पाण्यासोबत वहात जाऊन गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी करणने देखील पाण्यात उडी मारली. यात दोघेही वाहून गेले. विनयचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. (प्रतिनिधी)
करण जाधव याच्यावर मीरा रोडला अंत्यसंस्कार
By admin | Updated: January 11, 2017 07:08 IST