मीरा रोड : अल्पवयीन मुलीला शरीरविक्रय व्यवसायासात ढकलून पैसा मिळविण्यात तिच्या फळविक्रेता बापाचा अडसर होता. तो दूर करण्यासाठी पाच लाखाची सुपारी देऊन त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चौघांना अटक केली असून दोघे फरार आहेत, अशी माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिली.काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ एप्रिलच्या मध्यरात्री गोळी झाडून फळविक्रेत्याची हत्या करण्यात आली. सुपारी देणाऱ्याचे फळविक्रेत्याच्या पत्नीशी असलेले अनैतिक संबंध व विक्रेत्याकडून सव्वापाच लाख येणे हेही हत्येमागील कारणे सांगितली जात आहेत. मीरागाव मागील गंगानगरच्या कृष्णा - सरस्वती इमारती समोरच शेट्टी चाळीत राहणारया शामू गौड(४०) याची हत्या केली. तपासात पोलिसांनी सुनीलकुमार बितुली रजक उर्फ राजू (३५) याला ताब्यात घेतले. शरीरविक्रयासाठी महिला पुरवण्याचे काम सुनीलकुमार करायचा. त्याचे शामूच्या पत्नीशी प्रेम संबंध होते. त्याची कल्पना शामूलाही होती. त्यातच २०१२ मध्ये सुनीलकुमारला झारखंड पोलिसांनी त्याची पत्नी मुन्नीदेवीच्या हत्येप्रकरणी अटक केली होती. तो जेलमध्ये असताना शामू व त्याच्या पत्नीकडे त्याने स्वत:च्या मदतीसाठी दागिने व रोख ५ लाख २३ हजार ठेवले होते. जेलमधून सुटल्यावर सुनीलकुमार सतत शामूकडे दागिने व पैशांची मागणी करत होता. त्यातून दोघांचे खटके उडत होते. दरम्यान, शामूची अल्पवयीन मुलीला शरीरविक्रय व्यवसायाला लावून बक्कळ पैसा कमावण्याचा सुनीलकुमारचा इरादा होता. पण शामू अडसर ठरत असल्याने त्याने झारखंड येथील राजेश रविदास याला शामूच्या हत्येसाठी पाच लाखाची सुपारी दिली. राजेशने सुदीपकुमार रविदास, आशिषकुमार भुईया, बबलू रविदास व उमेश रविदास यांना मुंबईला आणले. सहा एप्रिलच्या मध्यरात्री उमेश व सुदीप शामूच्या घरी गेले. दार ठोकले असता शामू बाहेर येताच जवळुन गोळी झाडली. गंभीर जखमी झाल्याने त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
फळविक्रेत्याचे चौघे मारेकरी अखेर अटकेत
By admin | Updated: April 24, 2017 02:09 IST