उल्हासनगर : शिवसेनेचे पदाधिकारी व माजी नगरसेवक प्रधान पाटील यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. पाटील याला रात्री अटक केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. उल्हासनगर महापालिकेत गेले 10 वर्ष शिवसेना नगरसेवक राहिलेले, प्रधान पाटील व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक आहेत.
काही दिवसांपूर्वी डोंबिवली येथे राहणारी एक महिला ब्युटीपार्लरसाठी दुकानाचा गाळा हवा. याबाबत चौकशी करण्यासाठी त्यांच्याकडे आली होती. तेंव्हा पाटील यांनी सदर महिलेस वेगवेगळ्या ठिकाणी गाळे दाखवले. दरम्यान २२ जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पाटील यांनी सदर महिलेस बोलावून स्वतःच्या कार मध्ये बसवून दुकानाचा गाळा दाखवण्याच्या निमित्ताने अंबरनाथ मधील कानसई भागात नेले. कार निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी उभी करून गाडीतच बळजबरीने अत्याचार केला. झालेल्या घटनेमुळे महिला प्रचंड घाबरली होती. अखेर तिने अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलीस ठाणे गाठून पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रधान पाटील यांच्यावर रात्री उशिरा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रात्री प्रधान पाटील याला अटक केली असुन भादवी गुन्हा नं.०२२८/१९ भा.द.वी कलम ३७६,५०६ (२) ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला. अधिक तपास वरिष्ठ पो.नि मनजितसिंग बग्गा हे करीत आहेत.