उल्हासनगर : निवडणूक आचारसंहिता पथकाने एकाच परिसरातून भाजपाचे १३५ झेंडे जप्त केले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे. पोलीस चौकशीत खरा प्रकार उघड होणार असल्याची प्रतिक्रिया निवडणूक अधिकारी व आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.कॅम्प नं.-३ येथील स्टेशन रोड, राधाबाई कृष्णानी चौक, इंदिरा भाजी मार्केट रस्ता आदी ठिकाणी भाजपाचे झेंडे लावले होते. त्याची माहिती आचारसंहिता पथकातील अजित गोवारी यांना मिळाल्यावर त्यांनी १३५ झेंडे जप्त केले. गोवारी यांनी याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रभागात भाजप विरुद्ध साई पक्षाची टक्कर असून दोन्हीकडून उद्योगपतींची मुले रिंगणात आहेत. पक्षाची प्रतिमा मलीन होण्यासाठी विरोधी पक्षाचे हे काम असल्याची प्रतिक्रिया भाजपाने दिली. आचारसंहिता विभागाने अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याऐवजी स्थानिक भाजपा उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. निवडणूक अधिकारी व पालिका आयुक्त यांनी मात्र पोलीस योग्य रीतीने तपास करून खऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करतील, असे सांगितले.प्रभाग क्र.-११ मधून भाजपाच्या तिकिटावर आकाश चक्रवर्ती यांच्यासह चार उमेदवार रिंगणात आहेत. तर, साई पक्षाच्या तिकिटावर कमल पंजाबी यांच्यासह चार जण रिंगणात असून त्यांच्यात काट्याची टक्कर असल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)
झेंडे भाजपाचे, गुन्हा अनोळखी व्यक्तीवर
By admin | Updated: February 7, 2017 04:03 IST