अंबरनाथ, बदलापुरात अग्निशामक सेवा सप्ताहला सुरुवात
By पंकज पाटील | Published: April 15, 2023 05:44 PM2023-04-15T17:44:59+5:302023-04-15T17:45:16+5:30
अंबरनाथ आणि बदलापूर शहरात अग्निशामक दलाच्या वतीने अग्निशमन सप्ताहाची सुरवात झाली.
अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात अग्निशामक दलाच्या वतीने अग्निशमन सप्ताहाची सुरवात झाली. पहिल्याच दिवशी शहिद अग्निशमन जवानांना बदलापुरात मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेश गोडसे यांनी मांजर्ली येथील अग्निशमन केंद्रात मानवंदना तर अंबरनाथ नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी चिंचपाडा येथील अग्निशमन केंद्रात मानवंदना दिली.
तर अंबरनाथ व बदलापूर अग्निशमन दलाची संयुक्त अग्निशमन जनजागृती रॅली संपूर्ण बदलापूर व अंबरनाथ शहरात काढण्यात आली. रॅलीमध्ये एकूण ४ अग्निशमन वाहने व २० बाईक व एक फायर जीपचा ताफा होता. अग्निशमन विभागाच्या संयुक्तिक रॅली मुळे अग्निशमन जवान व दोन वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये अग्निशमन विभानगामधील समन्वय व नियोजनाची प्रचिती येते तसेंच दोन्ही शहरामधील नागरिकांच्या अग्निसुरक्षेबाबत शाश्वती मिळते. बदलापूर पश्चिमेच्या अग्निशमन केंद्रात अग्निशमन व बचाव साहित्याची प्रदर्शनी आयोजित केलेली असून नागरिकांनी सदर अग्निशमन केंद्रास भेट देऊन अग्निशमन साहित्य व अग्निशमन दलाच्या कार्यप्रणालीची ओळख करून घ्यावी असे आवाहन अग्निशमन प्रमुख डॉ भागवत सोनोने यांनी नागरिकांना केले आहे.
आंतरराष्ट्रीय फायरफायटर डे हा ४ मे असला तरी भारतामध्ये १४ एप्रिल रोजी हा दिन साजरा केला जातो. कारण १९४४ साली फोर्टस्टीकेन या मालवाहू जहाजाला अचानक आग लागली. या जहाजातून युद्धसामुग्री आणि स्फोटकांच्या कापसाच्या गाठींनी वाहतूक केली जात होती. या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचे ६६ जवान आगीच्या भक्ष्यस्थानी आले. देशातील ही सर्वात मोठी घटना होती. या जवानांच्या बलिदानाच्या सन्मानार्थ देशात दरवर्षी १४ एप्रिल रोजी अग्निशमन दिन साजरा केला जात आहे.