भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेत विविध करांच्या माध्यमातून जमा होणाऱ्या रकमेचा अद्याप विमाच काढला नसल्याचे वृत्त १६ जानेवारीच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत आस्थापना विभागाने विमा काढण्याच्या कार्यवाहीला सुरुवात केली आहे. यामुळे असुरक्षित रकमेसह ती घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याला विम्याचे कवच मिळणार आहे. पालिकेत मुख्यालयासह प्रभाग कार्यालये, परिवहन विभाग व विभागीय कार्यालयात पाणीपट्टी, मालमत्ताकर, जाहिरातकर, मंगल कार्यालय शुल्कातून दररोज सुमारे १० ते १५ लाखांची रक्कम जमा होते. ती लेखा विभागातील कर्मचारी, एक शिपाई व सुरक्षारक्षकासोबत बँकेत जमा करण्यासाठी नेली जाते. त्या वेळी सोबत असलेल्या सुरक्षारक्षकाकडे शस्त्र नसल्याने ती घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली होती. मुख्यालयातील रक्कम बँकेत जमा करण्यासाठी मात्र त्या कर्मचाऱ्याला वाहन दिले जाते. इतर कार्यालयांत जमा होणारी रक्कम मुख्यालयात जमा करण्यासाठी अनेकदा एकट्या कर्मचाऱ्यालाच दुचाकी अथवा रिक्षातून जावे लागते. यामुळे त्या कर्मचाऱ्यासह त्याच्यासोबत असलेली रक्कम असुरक्षित असतानाही पालिकेने गांभीर्य दाखवलेले नाही. शहरात रक्कम लुटण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे रकमेचा विमा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
अखेर रकमेचा विमा काढणार
By admin | Updated: January 23, 2017 05:24 IST