लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मुंब्रा शीळ भागातील खान कंपाउंड येथे उभारण्यात आलेल्या २१ अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू केली. या कारवाईला १३ जूनपासून सुरुवात झाली होती. अखेर येथील २१ इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. या कामासाठी झालेला खर्च महापालिका बोजा म्हणून संबंधितांवर टाकणार आहे. तर हे क्षेत्र ग्रीन झोनमध्ये मोडत असल्याने या ठिकाणी महापालिकेने विविध वृक्षांची लागवड सुरू केली आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर, ठाणे महापालिकेने मुंब्रा शीळ भागातील गट क्रमांक १७८, १७९ आणि १८०, शीळ येथील १७ अनधिकृत इमारतींवर पालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत १३ जूनपासून सलग चार दिवस कारवाई करण्यात आली. या कारवाईत १२ इमारती भुईसपाट करण्यात आल्या. त्यानंतर चार इमारतींच्या रहिवाशांनी न्यायालयात कारवाईला स्थगिती देण्यासाठी धाव घेतली.
आणखी चार इमारतींची भरन्यायालयाची मुदत संपल्यानंतर अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह पालिकेचे पथक आणि पोलिस बळ घेऊन याठिकाणच्या अनधिकृत इमारतींवर कारवाई केली जात होती. या ठिकाणी सुरुवातीला १७ इमारती असल्याचे सांगण्यात येत होते; परंतु कारवाई सुरू असताना त्या ठिकाणी आणखी ४ इमारती वाढीव असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार या इमारतींवर कारवाई करण्यात आली. आता या २१ इमारती पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
महापालिका करणार रोपलागवडदुसरीकडे, येथील क्षेत्र पूर्ववत करण्याचे कामही आता केले जात आहे. येथील क्षेत्र हरित क्षेत्रात मोडत असल्याने महापालिकेने पहिल्या टप्प्यात पाडकाम केलेल्या इमारतींच्या ठिकाणी वृक्षांची लागवड करीत आहे. तसेच टप्प्याटप्प्याने इतर ठिकाणी अशाच पद्धतीने वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली.