लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : ब्युटीपार्लरचालिकेकडे ‘पीटा’चा गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन लाखांची लाच मागणाऱ्या नवघर ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याविरोधात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भार्इंदर पूर्वेला गोल्डन नेस्ट चौकीमागे एका महिलेचे ब्युटीपार्लर आहे. ७ मे रोजी नवघर पोलीस ठाण्याचा शिपाई जीवन पाटील याने ब्युटीपार्लरमध्ये जाऊन एका महिला कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले. पाटील याने चालक महिलेस तुम्ही पार्लरआड शरीरविक्रय व्यवसाय चालवता. तुमच्याविरोधात ‘पीटा’चा गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन लाख द्या, असे धमकावले. महिलेने ९ मे रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक शाखेकडे तक्रार केली. या शाखेच्या पोलीस निरीक्षक वैशाली रासकर यांनी तपास केला. परंतु, पोलिसांनी पाटील यांना रंगेहाथ पकडण्याचा लावलेला सापळा मात्र फसला. अखेर, बुधवारी रासकर यांनी दोन लाखांची मागणी केल्याप्रकरणी पाटीलविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पाटील याला निलंबित केले जाणार आहे.
पोलिसाविरोधात गुन्हा दाखल
By admin | Updated: June 29, 2017 02:51 IST