सदानंद नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : अवघ्या १३ किमी क्षेत्रफळाच्या उल्हासनगर शहरात रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरणे या कामांवर वर्षाला ४० कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करूनही शहरातील रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. चालूवर्षी फक्त रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी १७ कोटींच्या निधीची तरतूद केल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली असून, इतर रस्त्यांच्या पुनर्बांधणीवर ३० कोटींपेक्षा जास्त खर्च महापालिका करणार आहे.
उल्हासनगरात ७० टक्के रस्ते काँक्रिटचे, तर इतर रस्ते डांबरी आहेत. त्यांची एकूण लांबी १५५ किमीपेक्षा जास्त असल्याची माहिती महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. रस्ता दुरुस्ती व पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे भरण्यावर महापालिका वर्षाला ४० कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था झाली. पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी साडेसहा कोटींच्या निधीची तरतूद महापालिकेने केली. मात्र पाऊस लवकर सुरू झाल्याने रस्त्यातील खड्डे भरणे राहून गेले. नंतर संततधार पावसाने खड्ड्यांच्या संख्येत वाढ होऊन बहुतांश रस्त्यांची चाळण झाल्याचे कारण पुढे करून १० कोटींचा निधी वाढून दिला. रस्त्यांची दुरुस्ती व खड्डे भरण्यावर १७ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. रस्ते पुनर्बांधणीवर वेगळा खर्च केला जातो. वर्षाला केवळ रस्त्यावर ४० कोटींपेक्षा जास्त खर्च होत असल्याची माहिती शहर अभियंता महेश शितलानी यांनी दिली.
शहरातील रस्ते दुरुस्ती, रस्त्यातील खड्डे भरणे व रस्त्याच्या पुनर्बांधणीची कोट्यवधींची कामे जय भारत कन्स्ट्रक्शन, जय हिंद कन्स्ट्रक्शन, झा अँड पी कंपनी, सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन आदी मोजक्याच ३ ते ४ कंपन्यांना वाटून दिले जात असल्याचा आरोप होत आहे. काही रस्त्यांची कामे १० टक्क्यांपेक्षा जास्त दराने, तर काही बांधकामे ५ टक्के कमी दराने केली जात असल्याची माहिती कार्यकारी अभियंता महेश शितलानी यांनी दिली.
------------