ठाणे : ठाणे महापालिकेची महासभा ही नेहमीच वादाचा विषय ठरली आहे. परंतु, शुक्रवारी होणारी महासभा आता आणखी वादळी ठरण्याची चिन्हे आहे. कारण, या महासभेत काही भूखंड खाजगी संस्थेला देणे, शिक्षण विभागाचे कोट्यवधींचे विषय, आरोग्य विभागाच्या विषयांसह इतर काही चुकीचे विषय चर्चेसाठी आले आहेत. यासंदर्भात आधीच आक्षेप असल्याने त्याविरोधात राष्टÑवादीने आक्रमक भूमिका घेऊन ते कोणत्याही परिस्थितीत मंजूर करू दिले जाणार नसल्याचा इशारा दिला.गुरुवारी राष्टÑवादीच्या नगरसेवकांची बैठक पार पडली असून तीत त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या दालनातील या बैठकीला गटनेते हणमंत जगदाळे, सुहास देसाई, नजीब मुल्ला, शहराध्यक्ष आनंद परांजपे आदींसह इतर नगरसेवक उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून जे काही चुकीचे प्रस्ताव महासभेच्या पटलावर आणले आहेत, त्याला विरोध करण्याचे निश्चित करण्यात आले. यामध्ये कौसा रुग्णालयातील साहित्याचा विषय, रिक्षास्टॅण्डवर जाहिराती प्रसिद्ध करणे, आरोग्य विभागांतर्गत हॅप्पीनेस इंडेक्स वाढविणे, गरोदर महिलांची पूर्वतपासणी, शाळांचे स्टील फर्निचर खरेदी करणे, लाकडी फर्निचर खरेदी करणे, गल्ली आर्ट स्टुडिओ, उच्चशिक्षणाकरिता केंद्र उभारणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी योजना, शहर वैविध्यता योजना, डीजी शाळांतर्गत हॅप्पीनेस इंडेक्स वाढविणे, पर्यवेक्षकांच्या नेमणुका, दप्तराचे ओझे कमी करणे, दीपस्तंभ योजना, टाटा हॉस्पिटल कॅन्सर रुग्णालय, खाजगी रुग्णालयाला नेत्रालय उभारण्यासाठी जागा देणे, आदींसह इतरही काही महत्त्वाचे प्रस्ताव पटलावर आहेत. या विषयांमध्ये बहुतेक विषय हे आरोग्य विभाग म्हणजेच डॉ. आर.टी. केंद्रे यांच्याशी निगडित आहेत. त्यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर चुकीच्या पद्धतीने त्यांना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे यालासुद्धा राष्टÑवादीचा विरोध आहे.>महासभा ठरणार वादळीशिक्षण विभाग आणि काही भूखंड हे खाजगी संस्थेच्या घशात घालण्याचे प्रस्तावही मंजुरीसाठी पटलावर ठेवले आहेत. त्यांनाही विरोध करण्यात येणार आहे, त्यामुळे शुक्रवारी होणारी महासभा ही वादळी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
वादग्रस्त प्रस्तावांच्या विरोधात एल्गार, भूखंडांची खिरापत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 01:17 IST