ठाणे : ठाण्यातील दक्ष नागरिक आणि काही समविचारी पक्ष-संघटनांनी मिळून तयार केलेल्या ‘ठाणे मतदाता जागरण अभियाना’ने ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उडी घेतली आहे. निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या उमेदवारांची पहिली १३ जणांची यादी बुधवारी जाहीर केली. या निवडणुकीत अभियानाकडून एकूण ६५ उमेदवार उभे केले जाणार आहेत. ठाण्यात युती आघाड्यांचा घोळ सुरू आहे. इतर लहान पक्षांमध्ये त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे अभियानाने जाहीर केलेली उमेदवारांची ठाण्यातील ही पहिली यादी ठरली आहे. या निवडणुकीसाठी ठाण्यातील दक्ष नागरिक, काही समविचारी पक्ष, संघटना आणि प्रतिष्ठित नागरिकांची एक मोट बांधली आहे. ‘ठाणे मतदाता जागरण अभियान’ असे त्याला नाव देऊन यामार्फत ६५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे जाहीर केले. ठामपाची सत्ता ज्या प्रस्थापित पक्षांच्या हातात आहे, त्या पक्षांनी ठाणेकरांच्या सुखसोयींची ‘ऐशी की तैशी’ केली आहे. विकासाच्या नावाने शहरात अनागोंदी माजवली आहे. म्हणूनच, या शहराला वाचवण्यासाठी हातावर हात धरून बसणे योग्य होणार नाही. त्याकरिता, मतदान करणे हे जसे प्रत्येक मतदार नागरिकांचे कर्तव्य आहे, तसे योग्य उमेदवार निवडून देणे, हेही कर्तव्य आहे. म्हणूनच, दक्ष मतदार आणि दक्ष नागरिक म्हणून आम्ही या निवडणुकीत उतरलो आहोत, असे या अभियानाचे अध्यक्ष अनिल शाळीग्राम यांनी सांगितले. या निवडणुकीत आमचा मंच प्रस्थापित पक्षांच्या अपयशाची मतदारांसमोर चिरफाड करेल, असेही ते म्हणाले. बुधवारी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये घेतलेल्या या पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर झाली. (प्रतिनिधी)
ठाण्यातील दक्ष नागरिक आता रिंगणात
By admin | Updated: January 26, 2017 02:57 IST