कल्याण : डोंबिवलीत भोपर येथील प्रायमाटेक्स मशिनरी प्रायव्हेट लिमिडेट या बंद कंपनीच्या कामगारांची थकीत देणी देण्यापूर्वीच कंपनी मालकाने अव्हेन्यू सुपर मार्केटला जागा विकल्याने देणी मिलेपर्यंत तेथील बांधकाम रोखण्याची आणि एनओसी रद्द करण्याची मागणी आगरी यूथ फोरमने सहाय्यक कामागार आयुक्तांकडे केली आहे. या जागेवर डी मार्ट मॉल उभारण्याचे काम सुरु आहे. कामगारांच्या मागणीनुसार मॉलच्या बांधकामाला दिलेली एनओसी रद्द करण्याचा प्रस्ताव कामगार आयुक्तांकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त प्र. ना. पवार यांनी दिली.कामगारांनी मागण्यांसाठी सहाय्यक कामगार आयुक्तांच्या दालनात मंगळवारी बैठक घेतली. त्यात एनओसी रद्द करण्याची आणि बेकायदा बांंधकामप्रकरणी एमआरटीपी अॅक्टअंतर्गत कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, अव्हेन्यू सुपर मार्केट कंपनीचे अल्वीन मचारडो, मार्टीस आणि कायदेशीर बाजू पाहणाऱ्या नेहा नायक उपस्थित होत्या. प्रायमाटेक्स ही कंपनी २३ वर्षापूर्वी बंद पडली. तेव्हा त्यात ५४२ कामगार होते. त्यांना कंपनीकडून थकीत देणी मिळाली नव्हती. त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावेळी ४१ कोटींची देणी देणे लागत असल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी तडजोडीची रक्कम म्हणून १५ कोटी रूपये कामगारांना देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यापैकी २ कोटी ३१ लाख रुपये कामगारांना लाभांशापोटी मिळाले. १३ कोटी रुपये मिळणे बाकी आहे. प्रायमाटेक्स कंपनी मालकाने ही कंपनी लिलावात काढली. ती अव्हेन्यू सुपरमार्केटने घेतली. सहानुभूती म्हणून अव्हेन्यूने ५४२ पैकी १७१ कामगारांना प्रत्येकी ३० हजारांचा धनादेश दिला. कंपनी लिलावात घेतल्याने कामगारांच्या देण्या-घेण्यांशी आमचा संबंंध नाही. १७१ कामगारांना ३० हजार रुपयांचे धनादेश प्रायमाटेक्स संघर्ष कामगार संघटनेच्या मान्यतेनंतरच दिल्याची माहिती कंपनीचे अल्वीन मचारडो यांनी दिली. उर्वरित कामगारांचे काय, असा सवाल कामगारांनी उपस्थित केला असता त्याचे दायित्व आमच्याकडे नाही. त्याला आम्ही बांधील नाही, असे मचारडो यांनी स्पष्ट केल्याने कामगार संतप्त झाले.
‘डी मार्ट’ मॉलच्या बांधकामाला खोडा
By admin | Updated: February 24, 2016 03:05 IST