अंबरनाथमधील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 05:52 AM2019-01-06T05:52:05+5:302019-01-06T05:52:24+5:30

अंबरनाथच्या औद्योगिक वसाहतींमुळे हजारो कामगार दररोज अंबरनाथ स्थानक ते आनंदनगर औद्योगिक वसाहतीपर्यंत वाहतूक करतात.

Dully empire on the streets of Ambernath | अंबरनाथमधील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

अंबरनाथमधील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

Next

अंबरनाथ: अंबरनाथच्या लोकनगरी पुलापासून ते थेट स्वामी समर्थ चौकापर्यंत जाणारा अंबरनाथचा पहिला बाह्यवळण रस्ता पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच येथून वाहतूक सुरू झाल्याने मातीच्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. त्यामुळे आसपासच्या निवासी संकुलांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आधी रस्ता पूर्ण करा, मगच वाहतुकीसाठी खुला करा, अशी मागणी आता रहिवाशांकडून होत आहे.

अंबरनाथच्या औद्योगिक वसाहतींमुळे हजारो कामगार दररोज अंबरनाथ स्थानक ते आनंदनगर औद्योगिक वसाहतीपर्यंत वाहतूक करतात. कामगारांसाठी बस कंपन्यांमार्फत दिल्या आहेत. यांची वाहतूक मुख्य शहरातून होत असल्याने वाहनांमुळे वडवली ते आनंदनगरपर्यंत मोठी वाहतूककोंडी होते. त्यात वडवली ते लोकनगरीच्या या महत्त्वाच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे कंपन्यांच्या बस जाण्यासाठी पर्यायी मार्ग काढण्यात येत आहे.
लोकनगरी पूल ते गोविंद पूलमार्गे स्वामी समर्थ चौकापर्यंतच्या पहिल्या बाह्यवळण रस्त्याची उभारणी केली जात आहे. याच्या आरेखनबदलाला एमएमआरडीएनेही मंजुरी दिल्याने त्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, या रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाल्याने आसपासचे दुकानदार, नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. या रस्त्याचे काम करण्यासाठी येथे सुरुवातीला मातीची भर घालण्यात आली. मात्र, अचानक मोठे ट्रक, बस अशा अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. हीच धूळ शेजारी असलेल्या रहिवासी संकुलांत जात आहे. यासाठी आता नागरिकांनी पालिका प्रशासनाला येथील वाहतूक थांबवण्यासाठी सह्यांची मोहीम सुरू केली असल्याची माहिती येथील दुकानदार संतोष महाडेश्वर यांनी दिली आहे. या धुळीमुळे इतर छोटी वाहने या रस्त्यावरून प्रवास करू शकत नाही. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता रहदारीसाठी खुला करू नये, अशी मागणी आता होत आहे.

लोकनगरी ते स्वामी समर्थ चौक या रस्त्याचे सध्या मजबुतीकरण केले आहे. याच रस्त्याचे काम एमएमआरडीएमार्फत केले जाणार आहे. मात्र, शिवाजी चौक ते वडवली या रस्त्याचे काम सुरू असल्याने जड वाहतूक या कच्च्या रस्त्यावरून सुरू केली आहे. त्याचा फटका आता स्थानिकांना बसत आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करताना किमान त्या ठिकाणी धूळ उडणार नाही, अशी व्यवस्था करण्याची गरज होती.
 

Web Title: Dully empire on the streets of Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे