कल्याण : रमजाननिमित्ताने तयार होणारे पदार्थ आणि उपवास सुरू करण्यापूर्वी किंवा सोडताना वाढलेल्या मागणीमुळे कल्याण, भिवंडीत गोठ्यातून वितरित होणाऱ्या दुधाच्या दरात गेल्या आठवडाभरात सतत वाढ होत गेली आहे. भिवंडीत तर अवघ्या दोन दिवसांत दर दहा रूपयांनी कडाडले आहेत. त्यामुळे मंगळवारी कल्याणच्या दूधनाक्यावरील दर ६५, तर भिवंडीत ६४ रूपयांवर पोहोचले.यंदा रमजान महिना उन्हाळ््यात आल्याने लस्सी, ताक, फिरनीसाठी (तांदळाच्या खिरीचा एक प्रकार) दुधाची मागणी वाढली आहे. मिठाईसाठीही दुधाचा वापर होतो. पण उन्हाळा प्रचंड असल्याने सध्या मिठाईसाठी दुधाची मागणी फार वाढलेली नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर रमजान ईदची तयारी सुरू झाली की मिठाईसाठीच्या दुधाची मागणी वाढत जाईल, असे दूधविक्रेत्यांचे म्हणणे आहे.सध्या दर वाढत गेल्याने गोठ्यातील दुधाचा आग्रह धरणाºया ग्राहकांची ससेहोलपट सुरू आहे. सर्वसाधारणत: चाºयाचे प्रमाण घटल्याने आणि उन्हामुळेही या काळात दुधाच्या प्रमाणात घट होते. परिणामी, दर चढेच असतात. त्यात यंदा रमजानची भर पडल्याने हे दर आणखी कडाडले आहेत. ईद जवळ आली, की नेहमीच दुधाचे दर आणखी वाढतात. तसे ते पुढच्या महिन्यात वाढण्याची शक्यता आहे.भिवंडीत सेहरीच्यावेळी तुर्रीसाठी वाढतेय मागणीभिवंडी : लोकसंख्येच्या ६० टक्के मुस्लिमबांधव शहरात राहत असून प्रत्येक कुटुंबात महिनाभर रोजा (उपवास) ठेवतात. रोजाच्या काळात प्रत्येक कुटुंबात उपवास सोडताना दूध किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. अनेक कुटुंबांत सेहरीसाठी दुधापासून ‘तुर्री ’बनवतात. परिणामी, दुधाच्या मागणीत वाढ झाली आहे. रमजानच्या पहिल्या दिवसापासून मागणी वाढल्याने दूधविक्रेत्यांनी ५४ रुपये लीटर असलेले दूध १० रुपयांनी वाढवून ६४ रुपये केले. त्यामुळे शहरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दुधाची दोन दिवसांत १० रुपयांनी झालेली भाववाढ पाहता रमजान ईदपर्यंत दुधाचे भाव १०० रुपये लीटर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात दूध उत्पादकांची संघटना असून याबाबत तक्रार करूनही दरवाढीकडे दुर्लक्ष केले आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
रमजानमुळे दुधाच्या दराला उकळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 06:44 IST