ठाणे : ठाणे महापालिकेत सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपाला आणखी एक धक्का बसला आहे. संजय घाडीगावकर यांच्यापाठोपाठ प्रभाग क्र. ८ ड मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले भाजपाचे लॉरेन्स डिसोझा यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी बाद करण्यात आला आहे. जातप्रमाणपत्र अवैधतेचा मुद्दा उपस्थित झाल्याने व त्यांना सहा वर्षे निवडणूक लढवण्यास असलेली बंदी या बाबी पुढे आल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या देवराम भोईर अॅण्ड कंपनीला काहीसा दिलासा मिळाला आहे.महापालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत लॉरेन्स डिसोझा यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून राष्ट्रवादीचे देवराम भोईर यांचा निसटता पराभव केला होता. सलग पाच वेळेस निवडून आलेल्या भोईरांना हा जबरदस्त धक्का होता. परंतु, त्यानंतर डिसोझा यांचा जातप्रमाणपत्र मुद्दा उपस्थित झाल्याने मागील वर्षी त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. त्यानंतर, या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत भोईर यांना शिवसेनेची साथ लाभल्याने ते बिनविरोध निवडून आले. त्यानंतर, त्यांनी मागील महिन्यात शिवसेनेतच प्रवेश केला. परंतु, त्यांच्या प्रवेशामुळे आपला पत्ता कट होणार, हे लक्षात आल्यानंतर डिसोझा यांनी भाजपात प्रवेश केला होता. डिसोझा यांच्या प्रवेशाच्या वेळेस भाजपाने वकील लावून त्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण करून त्यांना प्रवेश दिला होता. याच सोपस्कारानंतर त्यांना भाजपाने प्रभाग क्र.-८ ड मधून उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांच्यासमोर या निवडणुकीत देवराम भोईर यांचे पुत्र संजय भोईर हे होते. त्यामुळे या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. डिसोझा आधीचा वचपा काढणार, असे बोलले जात होते. परंतु, जातप्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित करून संजय यांनी त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. शनिवारी त्यांच्यावरील सुनावणी प्रलंबित ठेवली होती. त्यानंतर, सोमवारी यावर पुन्हा सुनावणी झाली आणि अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मागील निर्णयानुसार त्यांच्या जातप्रमाणपत्राचा मुद्दा ग्राह्य धरून आणि सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढवता येत नसल्याचे सांगून त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला आहे. त्यामुळे भाजपाला निवडणुकीपूर्वीच दुसरा धक्का बसला आहे. (प्रतिनिधी)
डिसोझा यांचा अर्ज अखेर बाद
By admin | Updated: February 7, 2017 04:04 IST